
गेल्या अनेक महिन्यांपासून राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे केंद्र सरकारच्या राजकारणात जाणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. फडणवीसांच्या नुकत्याच झालेल्या दिल्ली दौऱ्यानंतर या चर्चांना उधाण आले होते. मात्र, एका माध्यमाच्या कार्यक्रमात बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी या सर्व चर्चांना पूर्णविराम दिला असून, २०२९ पर्यंत आपण महाराष्ट्रातच राहणार असल्याचे स्पष्ट केले आहे.

“काहींना वाटते दिल्लीला गेलो तर बला टळेल!”

दिल्लीत जाण्याच्या चर्चांवर भाष्य करताना फडणवीस यांनी आपल्या खास शैलीत विरोधकांवर निशाणा साधला. खूप लोकांना वाटते मी दिल्लीला गेलो तर माझे प्रमोशन होईल, तर काहींना वाटते मी दिल्लीत गेलो तर बला टळेल, आपल्या डोक्यावरून संकट दूर होईल! पण कोणाला चांगले वाटो किंवा वाईट, २०२९ पर्यंत माझे नेते मला महाराष्ट्रातच ठेवतील.मला राजकारण कळते आणि माझा पक्षही कळतो. दर दोन-तीन महिन्यांनी कोणाला बातमी मिळाली नाही किंवा नवीन न्यूज क्रिएट करायची असली, की मला दिल्लीला पाठवतात. पण माझा पक्ष आणि माझे नेते ज्या दिवशी ठरवतील, त्या दिवशी मी नक्की दिल्लीला जाईन.

२०३० पर्यंत महाराष्ट्र होणार ‘१ ट्रिलियन डॉलर’ अर्थव्यवस्थेचे राज्य
यावेळी फडणवीस यांनी महाराष्ट्राच्या आर्थिक प्रगतीवर आणि विकासाच्या ध्येयावरही महत्त्वपूर्ण भाष्य केले.महाराष्ट्र हे देशामधील पहिले राज्य आहे जे १ ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेचे स्वप्न पाहत आहे. सध्या आपण ६६० बिलियन डॉलरवर पोहोचलो असून १ ट्रिलियनच्या खूप जवळ आहोत. सध्या महाराष्ट्राचा विकासदर (Growth Rate) ८.८ टक्के आहे. हा दर चांगला असला तरी आपल्याला १० टक्क्यांहून अधिक विकासदराचा टप्पा ओलांडायचा आहे. आपण जर असाच शाश्वत विकासदर कायम ठेवला, तर निश्चितपणे २०३० पर्यंत महाराष्ट्र १ ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेचे राज्य बनेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

