
केतन अग्रवाल हत्याकांड: रितेश हंगेचा कटात सक्रिय सहभाग; डिलीट केलेल्या व्हॉट्सॲप चॅटने उलगडले हत्येचे गुपित
केतन अग्रवाल हत्या प्रकरणात अटक करण्यात आलेला आरोपी रितेश हंगे याचा या संपूर्ण हत्येच्या कटात सक्रिय सहभाग असल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. केतनची हत्या करण्यापूर्वी आरोपी चेतन चौधरी, सिया गोयल आणि रितेश हंगे यांनी त्याला कशाप्रकारे संपवायचे, याबाबत सविस्तर चर्चा केली होती, अशी माहिती पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल्ल यांनी पत्रकार परिषदेत दिली. या पत्रकार परिषदेला गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर यांचीही उपस्थिती होती.

परराज्यातील ‘कॉन्ट्रॅक्ट किलर’चा प्रयत्न

पोलीस तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, आरोपींनी सुरुवातीला बाहेरील व्यक्तीद्वारे म्हणजेच परराज्यातील कॉन्ट्रॅक्ट किलरशी संपर्क साधून केतनची हत्या घडवून आणण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, नंतर हा पर्याय बाजूला ठेवून स्वतःच केतनला संपवण्याचा निर्णय आरोपींनी घेतला.

कोण आहे रितेश हंगे?
रितेश हंगे (वय २३, रा. पुणे) हा मुख्य आरोपी चेतन चौधरीचा कॉलेजमधील वर्गमित्र आहे. तो सध्या एका खासगी कंपनीत कार्यरत असून यापूर्वी त्याने बांधकाम आणि रिअल इस्टेट क्षेत्रातही काम केले आहे. तपासादरम्यान विविध व्यक्तींच्या नोंदवलेल्या जबाबांमध्ये रितेशचे नाव समोर आले. त्यानंतर पोलिसांनी त्याच्या हालचाली, तांत्रिक पुरावे आणि फॉरेन्सिक विश्लेषणाच्या आधारे तपास चक्रावून त्याला बेड्या ठोकल्या.
लोहगड परिसरातील उपस्थितीबाबत तपास सुरू
केतनची हत्या झाल्यानंतर मुख्य आरोपी चेतन चौधरीने रितेशची भेट घेतली होती. या भेटीदरम्यान चेतनने त्याला गुन्ह्याची पूर्ण माहिती दिली होती का, याचा पोलीस शोध घेत आहेत. याशिवाय हत्येच्या वेळी रितेश स्वतः लोहगड किल्ल्यावर उपस्थित होता का? याचाही तपास सुरू असून घटनेच्या वेळी लोहगड परिसरात उपस्थित असलेल्या काही प्रत्यक्षदर्शींचे जबाब नोंदवण्यात आले आहेत. रितेशला केवळ संशयावरून अटक केलेली नाही. त्याच्याविरोधात भक्कम तांत्रिक पुरावे आणि जबाब उपलब्ध झाल्यानंतरच ही कारवाई करण्यात आली आहे. गुन्ह्याची माहिती असणे आणि कटात प्रत्यक्ष सहभागी असणे या दोन्ही बाबी कायदेशीर कारवाईस पात्र आहेत,असे अधीक्षक गिल्ल यांनी स्पष्ट केले.
डिलिट केलेले व्हॉट्सॲप चॅट ठरले मुख्य पुरावा
या संपूर्ण प्रकरणाचा सुगावा लावण्यासाठी आरोपींच्या फोनमधील डिलिट झालेला डेटा अत्यंत महत्त्वाचा ठरला. रितेश, चेतन आणि सिया यांच्यातील डिलीट केलेले व्हॉट्सॲप चॅट पोलिसांनी तांत्रिक विश्लेषणाद्वारे पुन्हा मिळवले (Recover केले). यामध्ये केतनला इजा करून अपंग करणे तसेच त्याला संपवण्याचा कट रचण्याबाबतची धक्कादायक माहिती समोर आली आहे.सध्या उपलब्ध तांत्रिक पुरावे, प्रत्यक्षदर्शींचे जबाब आणि इतर आरोपींकडून मिळालेल्या माहितीची पोलीस सखोल पडताळणी करत आहेत.

