
गरिबी आणि आर्थिक विवंचनेला कंटाळून एका दांपत्याने आपल्या अवघ्या दीड वर्षांच्या चिमुकलीला देहूजवळील ऐतिहासिक भंडारा डोंगरावर एकाकी सोडून दिल्याची सुन्न करणारी घटना उघडकीस आली आहे. “एखादे दानशूर किंवा चांगले कुटुंब मुलीला सोबत नेऊन तिचा सांभाळ करेल,” या भावनेतून हे पाऊल उचलल्याची धक्कादायक कबुली या आई-वडिलांनी दिली आहे. या प्रकरणी तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात अजय शिवशंकर यादव (वय २३) आणि खुशबू अजय यादव (वय २२, दोघे रा. वासुली, मूळ रा. उत्तर प्रदेश) या दांपत्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दारिद्र्याचे चटके सोसवेना म्हणून उचलले टोकाचे पाऊल

मिळालेल्या माहितीनुसार, यादव दांपत्य वासुली परिसरात अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत राहते. पती मोलमजुरी करून कुटुंबाचा गाडा चालवतो, तर पत्नी गृहिणी आहे. स्वतःच्या परिस्थितीमुळे पोटच्या गोळ्याला दारिद्र्याचे चटके सोसावे लागू नयेत, या अगतिकतेतून त्यांनी रविवारी (६ सप्टेंबर) आपल्या दीड वर्षांच्या चिमुकलीला भंडारा डोंगरावर एकाकी सोडून दिले.

‘वायसीएम’च्या डॉक्टरांची भावनिक पोस्ट
डोंगरावर एकाकी सापडलेल्या या चिमुकलीला पोलिसांनी तात्काळ पिंपरी येथील यशवंतराव चव्हाण स्मृती (YCM) रुग्णालयात उपचारासाठी व देखभालीसाठी दाखल केले. रुग्णालयातील डॉ. प्रकाश कोयाडे यांनी या संपूर्ण प्रकरणावर सोशल मीडियावर एक अत्यंत भावनिक पोस्ट लिहिली, ज्यामुळे या घटनेची माहिती सर्वत्र पसरली आणि नागरिकांचे मन हेलावून गेले.
महिला पोलिसाला अश्रू अनावर
रुग्णालयात या चिमुकलीच्या देखभालीसाठी एका महिला पोलीस कर्मचाऱ्याची नियुक्ती करण्यात आली होती. पत्रकारांनी चिमुकलीच्या प्रकृतीविषयी व या घटनेविषयी विचारणा केली असता, ती चिमुकली आणि तिची परिस्थिती पाहून या महिला पोलीस कर्मचाऱ्याला आपले अश्रू रोखता आले नाहीत. “कोणतेही आई-वडील आपल्या पोटच्या गोळ्यासोबत असं कसं वागू शकतात?” अशी अत्यंत भावूक भावना त्यांनी यावेळी व्यक्त केली. सध्या या चिमुकलीची प्रकृती स्थिर असून, पोलिसांनी तिच्या आई-वडिलांवर कायदेशीर कारवाई सुरू केली आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरातून हळहळ व्यक्त केली जात आहे.

