
वाहतुकीचे नियम धाब्यावर बसवून आपल्या अलिशान ‘फॉर्च्युनर’ गाडीच्या नंबर प्लेटवर ऑटोमॅटिक काळा पडदा लावून फसवणूक करणाऱ्या चालकाला पिंपरी-चिंचवड प्रादेशिक परिवहन विभागाने (RTO) चांगलाच दणका दिला आहे. या बेकायदेशीर कृत्याबद्दल RTO अधिकाऱ्यांनी वाहनावर दंडात्मक कारवाई करत संबंधित चालकाविरोधात पोलिसांत कायदेशीर तक्रार दाखल केली आहे.

गाडीत बटण दाबताच नंबर प्लेटवर यायचा काळा पडदा!

पिंपरी-चिंचवडमधील ताथवडे परिसरातील या फॉर्च्युनर चालकाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला होता. या चालकाने आपल्या गाडीला एक भलतेच ‘ऑटोमॅटिक मेकॅनिझम’ बसवले होते. गाडीच्या आत असलेले एक बटण दाबताच स्वयंचलित काळा पडदा खाली यायचा आणि नंबर प्लेट पूर्णपणे झाकली जायची.

मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर (Mumbai-Pune Expressway) अतिवेगाने गाडी चालवताना आणि वाहतूक नियम मोडताना रस्त्यावरील स्पीड कॅमेऱ्यांत गाडीचा नंबर येऊ नये व ई-चलन (E-Challan) फाटू नये, यासाठी हा अनोखा आणि बेकायदेशीर जुगाड करण्यात आला होता.
तपासात धक्कादायक खुलासा: ५५ ई-चलन थकीत!
हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पिंपरी-चिंचवड RTO अधिकाऱ्यांनी तातडीने या वाहनाचा शोध घेतला. तपासादरम्यान एक अतिशय धक्कादायक माहिती समोर आली. या वाहनावर आधीपासूनच १ लाख २२ हजार रुपयांचे तब्बल ५५ ई-चलन थकीत होते. यातील बहुतांश दंड हा महामार्गावर अतिवेगाने (Speeding) गाडी चालवल्यामुळे झाला होता.
कारचा वापर एखाद्या गुन्ह्यात झालाय का? पोलिसांकडून चौकशी सुरू
हा प्रकार अत्यंत गंभीर आणि मोटार व्हेइकल ॲक्टचे (Motor Vehicles Act) उघडपणे उल्लंघन करणारा असल्याचे निदर्शनास आल्यानंतर RTO ने चालकाला मोठा दंड ठोठावला आहे. अतिवेगाने गाडी चालवल्यानंतर कॅमेऱ्यात नंबर येऊ नये म्हणूनच या चालकाने हा उद्योग केला होता. मात्र, अशा प्रकारचा बनावट ऑटोमॅटिक सेटअप वापरून ही गाडी एखाद्या गुन्हेगारी कृत्यात वापरली गेली आहे का? या दृष्टीनेही आता पोलीस चौकशी केली जाणार आहे, अशी माहिती पिंपरी-चिंचवडच्या उप प्रादेशिक परिवहन अधिकारी अश्विनी स्वामी यांनी दिली आहे. RTO च्या या धडक कारवाईमुळे वाहतुकीचे नियम पायदळी तुडवणाऱ्या आणि अशा क्लृप्त्या लढवणाऱ्या वाहनचालकांचे चांगलेच धाबे दणाणले आहेत.

