
पुणे शहर पोलीस दलात बनावट क्रीडा प्रमाणपत्रांच्या आधारे तब्बल १९ जणांनी पोलीस भरतीत नोकरी मिळवल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. ‘कुराश’ (पारंपरिक कुस्ती) आणि ‘ड्रॅगनबोट’ या खेळांची कधीही पार न पडलेल्या स्पर्धांची बनावट प्रमाणपत्रे तयार करून पोलिसांचीच फसवणूक करण्यात आली होती. या प्रकरणात पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी मोठी आणि धडक कारवाई करत सर्व १९ पोलिसांची नियुक्ती रद्द करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.

‘त्या’ एका चुकीमुळे फुटले बिंग!

या आंतरराज्यीय रॅकेटचा पर्दाफाश एका शहराच्या नावामुळे झाला. घोटाळेबाजांनी २०१८-१९ या वर्षातील दाखवलेल्या बोगस प्रमाणपत्रांवर ‘औरंगाबाद’ ऐवजी ‘छत्रपती संभाजीनगर’ आणि ‘उस्मानाबाद’ ऐवजी ‘धाराशिव’ अशी नावे छापली होती.राज्य सरकारने या शहरांचे अधिकृत नामांतर २०२३ मध्ये केले होते. त्यामुळे “२०१८ च्या प्रमाणपत्रावर २०२३ मध्ये झालेली नावे कशी आली?” असा प्रश्न तपास अधिकाऱ्यांना पडला आणि या एका चुकीमुळे ७५ कोटींचा हा महाघोटाळा चव्हाट्यावर आला.

७५ कोटींचा घोटाळा? १२-१५ शे जणांना बोगस प्रमाणपत्रे
पोलीस तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, २०१६ पासून राज्यात तब्बल १२-१५ शे उमेदवारांना प्रत्येकी ३ ते ५ लाख रुपये घेऊन ही बनावट प्रमाणपत्रे विकण्यात आली होती. शासकीय नोकरीत मिळणारे ५ टक्के क्रीडा आरक्षण लाटण्यासाठी हे रॅकेट चालवले जात होते. त्यामुळे या संपूर्ण घोटाळ्याची व्याप्ती तब्बल ७५ कोटी रुपयांपर्यंत असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा, दोन मुख्य सूत्रधारांना अटक
कोणतेही क्रीडा निरीक्षक उपस्थित नसताना, कसलेही रेकॉर्ड किंवा पावती पुस्तक नसताना ही बोगस प्रमाणपत्रे तयार केली जात होती. वरिष्ठ पोलीस निरीक्षक दीपक लगड यांच्या तक्रारीवरून पुण्यातील शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.गुन्हे शाखेने तात्काळ कारवाई करत ‘महाराष्ट्र राज्य कुराश असोसिएशन’चे अध्यक्ष अंकुश विठ्ठल नागर आणि सचिव शिवाजी साळुंखे या दोघांना अटक केली आहे.
आयकर आणि नोंदणी विभागाला पत्र
या घोटाळ्यातून कमावलेल्या बेकायदेशीर मालमत्तेची आणि संपत्तीची चौकशी करण्यासाठी पुणे पोलिसांनी नोंदणी व मुद्रांक विभाग तसेच आयकर विभागाला (Income Tax) पत्र पाठवले आहे. पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या या आक्रमक पावलामुळे बनावट प्रमाणपत्रांच्या आधारे नोकरी मिळवणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.

