Latest Marathi News
Ganesh J GIF

MPSC पेपरफुटीविरोधात संभाजी ब्रिगेडचा पुण्यात मोठा उद्रेक!; सचिवांच्या तोंडाला फासले काळे; नागपूरच्या मारबतमध्येही MPSC चा ‘बडगा’!

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) परीक्षांमधील कथित गैरप्रकार आणि औषध निरीक्षक परीक्षेच्या पेपरफुटीच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण महाराष्ट्रातील वातावरण चांगलंच तापलं आहे. एकीकडे विद्यार्थी रस्त्यावर उतरून आंदोलन करत असतानाच, पुण्यात एक अत्यंत धक्कादायक आणि खळबळजनक प्रकार समोर आला आहे. MPSC च्या भ्रष्ट कारभाराविरोधात आक्रमक झालेल्या संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी MPSC चे सचिव महेंद्र हरपाळकर यांच्या तोंडाला थेट काळे फासले आहे. या अचानक घडलेल्या घटनेमुळे पुणे आणि प्रशासकीय वर्तुळात प्रचंड तणावाचे वातावरण निर्माण झाले.

पुण्यात सचिवांना गाठून फासले काळे!

MPSC औषध निरीक्षक पेपरफुटी प्रकरणी संभाजी ब्रिगेडने याआधी ३ ऑगस्ट रोजी तीव्र आंदोलन छेडले होते. मात्र, प्रशासनाकडून योग्य कारवाई होत नसल्याने विद्यार्थ्यांसह संघटनांमध्ये मोठा असंतोष खदखदत होता. याच रागातून संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी गुरुवारी पुण्यात MPSC सचिव महेंद्र हरपाळकर यांना गाठून त्यांच्या तोंडाला काळे फासले आणि आयोगाविरोधात जोरदार घोषणाबाजी केली.

नागपूरच्या प्रसिद्ध ‘मारबत’ मिरवणुकीत MPSC चा ‘बडगा’!

MPSC च्या भोंगळ आणि भ्रष्ट कारभाराविरोधातील रोष आता केवळ आंदोलनापुरता मर्यादित राहिला नसून संस्कृती आणि लोकपरंपरेतही उमटू लागला आहे. नागपूरच्या प्रसिद्ध ‘मारबत’ मिरवणुकीत तरुणाईचा हाच संताप पाहायला मिळणार आहे.नागपूरच्या बिनाकी मंगळवारी परिसरातील पोळा मैदानाजवळील तरुणांनी MPSC च्या भ्रष्ट कारभारावर भाष्य करणारा एक खास ‘बडगा’ तयार केला आहे. “ईडा-पीडा घेऊन जा… गे मारबत” च्या गजरात MPSC च्या भ्रष्टाचाराचा हा बडगा नागपूरच्या रस्त्यांवर फिरवला जाणार आहे.

मुख्यमंत्र्यांची मध्यस्थी; SIT चौकशी आणि मुलाखतींना स्थगिती

दरम्यान, राज्यभरात पेटलेल्या या आंदोलनाची दखल घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी परीक्षार्थींच्या शिष्टमंडळासोबत सह्याद्री अतिथीगृहावर तातडीची बैठक घेतली. या बैठकीनंतर मुख्यमंत्र्यांनी खालील महत्त्वाच्या घोषणा केल्या:

गट ‘ब’ आणि गट ‘क’ पूर्व व मुख्य परीक्षा २०२५ ची विशेष तपास पथकाद्वारे (SIT) चौकशी होणार.

तक्रारी असलेल्या परीक्षांच्या उत्तरपत्रिकांची री-चेकिंग केली जाईल आणि तोपर्यंत मुलाखतीचा कार्यक्रम स्थगित राहील.

परीक्षांमधील घोळांसंदर्भात तक्रारी नोंदवण्यासाठी स्वतंत्र कक्ष स्थापन केला जाईल.

मुख्यमंत्र्यांच्या या आश्वासनानंतर विद्यार्थ्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असला, तरी प्रत्यक्षात कठोर कारवाई होईपर्यंत संघटनांचा आणि विद्यार्थ्यांचा उद्रेक कायम असल्याचे चित्र राज्यात पाहायला मिळत आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!