
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी अंतरवली सराटी येथे मनोज जरांगे पाटील यांचे बेमुदत उपोषण सुरू असून आज उपोषणाचा १४ वा दिवस आहे. प्रकृती खालावलेली असतानाही जरांगे आपल्या भूमिकेवर ठाम आहेत. या पार्श्वभूमीवर आज ‘कॉक्रोच जनता पार्टी’चे अध्यक्ष अभिजीत दिपके यांनी अंतरवली सराटीत जाऊन मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली आणि त्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शवला. या भेटीदरम्यान दिपके यांनी महायुती सरकारवर अत्यंत कडक शब्दांत टीका केली. एक माणूस समाजासाठी १४ दिवस उपाशी आहे. सरकारला इथे येऊन जरांगेंशी संवाद साधायला नेमकी हरकत काय आहे? असा थेट सवाल अभिजीत दिपके यांनी उपस्थित केला.

“लोकांची कामे सोडून सरकारचे नेते मस्त; हे सरकार निर्दयी!”

प्रशासकीय आणि राजकीय उदासीनतेवर ताशेरे ओढताना दिपके म्हणाले, “हे सरकार पूर्णपणे निर्दयी झाले आहे. मनोज जरांगे स्वतःसाठी नाही, तर संपूर्ण मराठा समाजातील तरुण-तरुणींना चांगले शिक्षण आणि रोजगार मिळावा यासाठी जीवाची बाजी लावत आहेत. जर सरकारने वेळेवर युवकांना शिक्षण आणि नोकऱ्या दिल्या असत्या, तर आज जरांगे यांना उपोषणाला बसण्याची वेळच आली नसती. जनतेने ज्या कामासाठी निवडून दिले, ती कामे सोडून सरकारने लोकांना वाऱ्यावर सोडले आहे.”

“२७ वर्षांचा मुलगा २.५ लाखांसाठी जीव देतो; जरांगे अशाच तरुणांसाठी लढत आहेत”
आरक्षणाच्या अभावामुळे होणाऱ्या परिणामांवर बोलताना दिपके यांनी कालच भेट घेतलेल्या मराठा आंदोलक स्व. प्रथमेश देशमुख यांच्या कुटुंबाचा उल्लेख केला. “मी कालच आत्महत्या केलेल्या प्रथमेश देशमुखच्या घरी गेलो होतो. केवळ अडीच लाख रुपयांच्या उधारीसाठी एका २७ वर्षांच्या तरुणाला आत्महत्या करावी लागते, ही अत्यंत दुर्दैवी बाब आहे. प्रथमेशसारख्या तरुणांनी आत्महत्या करू नये, त्यांना सवलती अन् रोजगार मिळावा, यासाठीच मनोज जरांगे उपोषणाला बसले आहेत,” असे दिपके भावुक होत म्हणाले.
“तुम्ही स्वतःची मुले परदेशात शिकवता, अन् ग्रामीण भागातील शाळांची दुरवस्था!”
सरकारला धारेवर धरताना ते पुढे म्हणाले, “निवडून दिलेले मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री नक्की काय करत आहेत? हे नेते स्वतःच्या मुलांना शिकण्यासाठी परदेशात पाठवतात. परंतु, महाराष्ट्रातील ग्रामीण भागात मुलांसाठी धड शाळाही उपलब्ध नाहीत. शहरात जाऊन शिकायची गरिबांची परिस्थिती नाही. दिल्लीत सोनम वांगचुक यांना २६ दिवस उपाशी ठेवले, आता जरांगेंनाही तसेच उपाशी ठेवणार आहात का?”
‘महाराष्ट्राला जरांगेंची गरज’ उपोषण मागे घेण्याची विनंती
मनोज जरांगे पाटील यांची खालावणारी प्रकृती पाहुन अभिजीत दिपके यांनी त्यांना उपोषण मागे घेण्याची विनंती केली. “मनोज जरांगे पाटलांची महाराष्ट्राला आणि मराठा समाजाला मोठी गरज आहे. त्यामुळे त्यांनी आपल्या प्रकृतीची काळजी घेत तात्काळ हे उपोषण मागे घ्यावे,” असे आवाहन त्यांनी जरांगे यांना केले.

