
हडपसर : साडेसतरानळी परिसरातील पाणीटंचाईची समस्या दूर करण्याच्या दृष्टीने महत्त्वाचे पाऊल उचलण्यात आले आहे. कॅनलमध्ये साचलेला गाळ आणि जलपर्णी काढण्याच्या कामाला अखेर सुरुवात झाली असून, क्रांती शेतकरी संघटनेने केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश आल्याचे चित्र आहे. साडेसतरानळी, हडपसर येथील सर्वे क्रमांक २०३ आणि २७४ परिसरातील बोरवेल आटल्यामुळे ग्रामस्थांना तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागत होता. त्यातच लष्कर पाणीपुरवठा विभागाकडून मिळणारा दररोजचा ४ ते ५ लाख लिटर पाणीपुरवठा संपूर्ण गावाच्या गरजेसाठी अपुरा ठरत होता. दुसरीकडे, कॅनलमध्ये मोठ्या प्रमाणावर गाळ आणि जलपर्णी साचल्याने पाण्याच्या प्रवाहात अडथळे निर्माण झाले होते. या गंभीर समस्येवर तोडगा काढण्यासाठी ग्रामस्थांनी क्रांती शेतकरी संघटनेचे अध्यक्ष तथा जनसेवक अमोल नाना यशवंत तुपे यांच्याकडे कॅनलमधील गाळ आणि जलपर्णी काढण्याची मागणी केली होती.

ग्रामस्थांच्या मागणीची दखल घेत अमोल नाना तुपे यांनी हडपसर-मांजरी क्षेत्रीय कार्यालयाचे सहाय्यक आयुक्त कुणाल धुमाळ, प्रभाग समितीचे अध्यक्ष प्रशांत मामा तुपे, तसेच इरिगेशन विभागाच्या पाटील मॅडम आणि कुदळे साहेब यांच्याकडे निवेदनाद्वारे सातत्याने पाठपुरावा केला. या पाठपुराव्यानंतर २३ ऑक्टोबर रोजी कॅनलमधील गाळ आणि जलपर्णी काढण्याच्या कामाला प्रत्यक्ष सुरुवात झाली. त्यामुळे परिसरातील पाणीपुरवठ्याची समस्या कमी होण्यास मदत होईल, अशी अपेक्षा ग्रामस्थांकडून व्यक्त केली जात आहे. दरम्यान, या कामाला सुरुवात झाल्याने ग्रामस्थांनी क्रांती शेतकरी संघटनेचे अध्यक्ष तथा जनसेवक अमोल नाना यशवंत तुपे यांचे आभार मानले आहेत. आता हे काम लवकरात लवकर पूर्ण होऊन ग्रामस्थांना दिलासा मिळणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


