माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना जामीन मंजूर
तब्बल इतक्या महिन्यानंतर देशमुख बाहेर, या कारणाने जामीन मंजूर
मुंबई दि ४(प्रतिनिधी)- माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादीचे आमदार अनिल देशमुख यांना जामीन मंजूर करण्यात आला आहे. १०० कोटी वसुली प्रकरणामुळे न्यायालयीन कोठडीत असलेल्या अनिल देशमुख यांच्या जामीन अर्जावर न्यायालयात सुनावणी झाली. त्यावेळी त्यांना हा दिलासा मिळाला अटकेच्या ११ महिन्यानंतर त्यांना जामिन मंजूर झाला आहे.
गेल्यावर्षी नोव्हेंबरमध्ये अनिल देशमुख यांना ईडीने अटक केली होती.पण आता देशमुख यांना १ लाख रुपयांच्या जात मुचलक्यावर जामीन मंजूर करण्यात आला आहे.
सर्वोच्च न्यायालयाने मुंबई उच्च न्यायालयाला निर्देश दिल्यानंतर जामीन अर्जावर मागील आठवड्यात सुनावणी पूर्ण करण्यात आली होती. मात्र निकाल राखीव ठेवला होता. आज अखेर त्यांना जामीन मंजूर करण्यात आला. देशमुख यांच्याविरोधात सीबीआय आणि ईडीने खंडणी वसुलीसह अनेक गंभीर आरोप ठेवले आहेत. मात्र केवळ राजकीय हेतूने माझ्यावर आरोप करण्यात आले असून, माझ्या विरुद्ध तपास यंत्रणेकडे कोणताही ठोस पुरावा नाही, असा दावा देशमुख यांनी केला होता. तसेच २६ आॅगस्टला ते जखमी झाले होते तेंव्हापासून ते जामीनसाठी प्रयत्न करत होते अखेर आज न्यायालयाने दिलासा देत जामीन मंजूर केला आहे.
अनिल देशमुख यांच्यावर मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह आणि सचिन वाझे यांनी १०० कोटी खंडणी गोळा करण्यास सांगितले होते असा आरोप आहे.तसेच अनिल देशमुख यांनी आपल्या पदाचा गैरवापर करून भ्रष्टाचार केल्याचा आणि बेनामी संपत्ती गोळा केल्याचा आरोप आहे.