
शिंदे सरकार राज्यातील जनतेची दिवाळी गोड करणार
शिंदे-फडणवीस सरकारचे दिवाळी गिफ्ट, या वस्तू मिळणार फक्त शंभर रुपयात
मुंबई दि ४(प्रतिनिधी)- रेशन कार्ड धारकांसाठी शिंदे-फडणवीस सरकारने यंदाची दिवाळी गोड करण्याचा निर्णय घेत गोड भेट दिली आहे. राज्यातील रेशनकार्ड धारकांना रवा, चणाडाळ, साखर आणि तेल यांचे प्रत्येकी एक-एक किलोचे पॅकेज अवघ्या शंभर रुपयात मिळणार आहे. त्यामुळे अनेक कुटुंबांची दिवाळी गोड होणार आहे.
गेल्या दोन वर्षांपासून करोनाच्या संकटातून सावरत यंदा राज्यातील गरीब जनतेची दिवाळी गोड करण्यासाठी दारिद्ररेषेखालील राज्यातील सुमारे दीड कोटी कुटुंबांना रवा, चणाडाळ, साखर आणि खजूर यासारखे पदार्थ नाममात्र किमतीत दिले जातील. या वस्तू वायदे बाजारातून तत्काळ खरेदी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अन्न व नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाने हा निर्णय घेतला आहे. मात्र एवढ्या मोठ्या खरेदीच्या निविदा मागवण्यासाठी अन्न व नागरी पुरवठा विभागाने अवघे दोन दिवस कसे दिले, असे प्रश्न उपस्थित झाले आहेत. त्यामुळे ही निविदा प्रक्रिया पारदर्शक होणार का? असा सवाल विचारला जात आहे. दरम्यान या भेटीसाठी सरकारी तिजोरीवर सुमारे ५०० कोटी रुपयांचा आर्थिक बोजा पडण्याची शक्यता आहे.
१०० रुपयांत या वस्तू मिळणार?
एक किलो साखर
एक किलो रवा
एक किलो चणाडाळ
एक लीटर तेल
ही दिवाळी भेट दिवाळीपूर्वी वाटप व्हावी त्यात कोणतीही तक्रारी येऊ नये अशा सुचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या आहेत.