
कारला टेकून उभा राहिल्याने लहान मुलासोबत कारचालकाचे असे कृत्य
घटनेचा व्हिडिओ होतोय जोरात व्हायरल, नेटकरी म्हणाले...
केरळ दि ४(प्रतिनिधी)- केरळमध्ये एका सहा वर्षाच्या मुलाच्या छातीवर लाथ मारल्यामुळे एका व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. या मुलाची चूक केवळ हीच होती की तो या इसमाच्या गाडीला टेकून उभा राहिला होता. गाडीला टेकल्याचा राग आल्याने या व्यक्तीने मुलाच्या छातीत लाथ मारली. संबंधित घटना सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झाली आहे. यावर संताप व्यक्त करण्यात येत आहे.
व्हायरल व्हिडीओत दिसत आहे की, एका गजबजलेल्या रस्त्याच्या कडेला एक पांढरी कार उभी आहे. एक लहान मुलगा या गाडीला टेकून उभा होता. याचवेळी गाडीचा मालक बाहेर आला आणि त्याने मुलाला गाडीला टेकलेले पाहून मुलाच्या छातीत लाथ मारली. यानंतर हा मुलगा गुपचूप तिथून निघून जाऊ लागला. मात्र घडलेली घटना पाहून आजूबाजूच्या लोकांनी लगेचच गाडीकडे धाव घेतली. आणि त्याला याबद्दल जाब विचारला. यावर मात्र त्याने पळून जाण्याचा प्रयत्न केला. पण तो अपयशी ठरला. कारचालकाचे नाव शिहशाद असून तो किपोन्नयामपालमचा राहणारा आहे. पोलिसांनी आरोपीवर गुन्हा दाखल करून त्याला ताब्यात घेतले आहे.
पीडित लहान मुलगा राजस्थानच्या एका श्रमिक कुटुंबाचा सदस्य आहे. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. अनेकांनी त्या कारचालकाच्या कृत्याबद्दल संताप व्यक्त करत कठोर कारवाईची मागणी केली आहे.