नांदेड दि ९ (प्रतिनिधी)- राज्याच्या राजकारणात लवकरच एका मात्तबर नेत्याच्या मुलीचा राजकारणात प्रवेश होणार असल्याची चर्चा आहे. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांची कन्या श्रीजया राजकारणात येण्याची शक्यता आहे. याला कारण ठरली आहे ती राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा या यात्रेत राहुल गांधीच्या बरोबरीने श्रीजयाचा वावर दिसून आला त्याचबरोबर अशोक चव्हाण यांनीही सुचक ट्विट केले आहे.
अशोक चव्हाण यांची कन्या श्रीजया मंगळवारी भारत जोडो यात्रेत सहभागी झाली. यावेळी तिने पदयात्रेत खासदार राहुल गांधी यांच्यासमवेत चर्चाही केली. त्यांच्या या भेटीचा व्हिडीओ वेगाने व्हायरल झाला. त्यानंतर सायंकाळी अशोक चव्हाण यांनी एक ट्वीट करून श्रीजयाच्या राजकीय पदार्पणाबाबत सूचक संकेत दिले आहेत. चव्हाण ट्विटमध्ये म्हणतात की,“पिल्लांच्या पंखात जेव्हा बळ येतं, त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण होतो आणि आभाळात झेप घेण्यासाठी जेव्हा ती सज्ज होऊ लागतात, तेव्हा पाखरांना होणारा आनंद अवर्णनीय असाच असणार” या ट्वीटमधील पाखराच्या पिल्लाने आभाळात झेप घेण्याचा संदर्भ श्रीजयाच्या राजकीय प्रवेशाबाबत असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. श्रीजयाने आजपर्यंत निवडणूक प्रचार वगळता स्वतःला राजकारणापासून दूर ठेवले होते.पण या पदयात्रेने ती राजकारणात पहिले पाऊल टाकल्याची चर्चा आहे.
पिल्लांच्या पंखांत जेव्हा बळ येतं,
त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण होतो,
आणि आभाळात झेप घेण्यासाठी
जेव्हा ती सज्ज होऊ लागतात,
तेव्हा पाखरांना होणारा आनंद
अवर्णनीय असाच रहात असणार.#BharatJodoYatra #मी_पण_चालणार pic.twitter.com/CNRj3vrEWr— Ashok Chavan (@AshokChavanINC) November 8, 2022
भारत जोडो यात्रा जाहीर झाल्यानंतर नांदेड जिल्ह्यातील आयोजनामध्ये त्या सक्रिय सहभागी झाल्या होत्या.यात्रेच्या स्वागतासाठी झळकलेल्या जाहिराती आणि बॅनरवरही त्यांचा फोटो होता. त्यामुळे भारत जोडो यात्रेचे निमित्त साधत त्यांनी राजकारण पाऊल ठेवल्याची चर्चा आहे. त्यामुळे आजोबा शंकरराव चव्हाण यांचा राजकीय वारसा श्रीजया कसा जपणार हे आगामी काळात दिसणार आहे.