
कन्नड रक्षण वेदिकेचा महाराष्ट्रातील वाहनांवर हल्ला
महाराष्ट्र सरकारची बोटचेपी भूमिका, कन्नडीगांकडून मात्र धुडगूस
बेळगाव दि ६(प्रतिनिधी)- महाराष्ट्राचे मंत्री बेळगावात येऊ देणार नाही असा इशारा देण्याऱ्या कन्नड रक्षण वेदिका संघटनेनं आता महाराष्ट्राच्या वाहनांवर हल्ला केल्याचा प्रकार समोर आला आहे. हिरबागेवाडी टोलनाक्यावर हा हल्ला झाला. महाराष्ट्राविरोधात कन्नड रक्षण वेदिका संघटना आक्रमक झाली आहे. संघटनेचे नारायण गौडा हे आज बेळगाव दौऱ्यावर आहेत.यामुळे पुन्हा एकदा सीमावाद प्रश्न गंभीर झाला आहे.
महाराष्ट्रातील मंत्र्यांनी आपला दाैरा रद्द केल्यानंतर कन्नड संघटना आक्रमक झाली आहे. वाहनांवर हल्ला करताना महाराष्ट्र एकीकरण समिती आणि महाराष्ट्र सरकारविरोधात घोषणाबाजीही यावेळी करण्यात आली. महाराष्ट्राच्या मंत्र्यांना बेळगावात येऊ देऊ नका, अशी मागणी कन्नड रक्षण वेदिका संघटनेच्या कार्यकर्त्यांनी बेळगावच्या जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे, तर महाराष्ट्राच्या मंत्र्यांना आणि खासदारांना बेळगावात प्रवेश दिला जाणार नाही, असं जिल्हाधिकाऱ्यांनी म्हटलं आहे.त्यामुळे कर्नाटक आक्रमक असताना महाराष्ट्र मात्र बघ्याच्या भूमिकेत दिसत आहे.संघनेच्या कार्यकर्त्यांनी बेळगावच्या चौकात रास्तारोको केला. तसंच रस्त्यावर लोळण घेत वाहने अडवली. तसेच वाहनाची तोडफोड केली आहे. महाराष्ट्रात या घटनेचा निषेध करण्यात आला असून कोल्हापूरात आंदोलन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला आहे.काही दिवसापूर्वी बसवर दगडफेक झाल्यामुळे सीमाभागातील बस वाहतूक दोन्ही राज्यांनी बंद केली आहे. पण कर्नाटक कडून मात्र धुडगूस घालण्यात आला आहे.
महाराष्ट्र आणि कर्नाटक यांच्यातील सीमावादाचा प्रश्न सध्या तापला आहे. यावरुन दोन्ही बाजूचे नेते सध्या आक्रमक झाले आहे. शिंदे-फडणवीस सरकारमधील मंत्री बेळगावच्या दौऱ्यावर जाणार होते. मात्र, त्याला कर्नाटक सरकारकडून विरोध करण्यात आला आहे. हे मंत्री कोणत्याही मार्गाने कर्नाटकमध्ये शिरू नये, यासाठी सीमाभागात नाकाबंदी करण्यात आली आहे. यासाठी पोलीस खबरदारी घेत आहेत.