पुणे दि २१(प्रतिनिधी)- पिंपरी- चिंचवड मधील पिंपळे गुरव येथे भरधाव दुचाकीवर फोनवर बोलणं चालकाच्या जीवावर बेतलं आहे. फोनवर बोलताना तो स्कुलबसच्या चाकाखाली आल्याने त्याचा मृत्यू झाला आहे. हा पिंपळे गुरवच्या काटे पुरम बॅडमिंटन हॉलच्या समोर घडला.
अपघाताची संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे.
शैलेश गजानन जगताप असे अपघातात मृत्युमुखी पडलेल्या तरुणाचं नाव आहे. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार पिंपळे गुरव परिसरातील रामकृष्ण मंगल कार्यालय परिसरातून शैलेश जगताप हे काटे पुरम चौकाकडे जात होते. दुचाकीवरून जात असताना शैलेश हे मोबाईलवर बोलत होते. परिणामी रस्त्यावर असणाऱ्या गतिरोधकाचा अंदाज त्यांना आला नाही आणि ते थेट जवळून जाणाऱ्या स्कूल बसच्या मागच्या चाकाखाली पडले. बसच्या चाकाखाली चिरडले गेल्याने शैलेश जगताप यांचा जागीच मृत्यू झाला. मृत शैलेश ने हेल्मेट वापरले असते तर त्याचा कदाचित जीव वाचला असता अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.
दुचाकी चालवताना प्रत्येकाने हेल्मेट वापरणे आवश्यक आहे. तसंच मोबाईल बोलणं टाळावं, असं आवाहन पोलीस प्रशासनाकडून करण्यात येत आहे. दरम्यान बॅडमिंटन हॉलच्या समोर सतत अपघात होत असल्याने गतिरोधक लावण्याची मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे.