पुणे दि २२(प्रतिनिधी)- पुण्यातील कसबा मतदार संघाच्या भाजपच्या आमदार मुक्ता टिळक यांचे निधन झाले आहे. त्या अनेक दिवसांपासून दुर्धर आजाराने ग्रस्त होत्या. गॅलक्सी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
मुक्ता टिळक यांचं शालेय शिक्षण पुण्यातील भावे स्कूलमध्ये झालं आणि त्यानंतर फर्ग्युसन महाविद्यालयातून त्यांनी पदवी घेतली. मानसशास्त्र या विषयातून त्यांनी एमए केलं पुढे त्या एमबीए देखील झाल्या. सन २००२ साली मुक्ता टिळक यांनी पहिली निवडणूक लढवली. महापालिका निवडणुकीत सर्वाधिक मतांनी निवडून येण्याचा मान त्यांच्या नावावर आहे. त्या सलग २५ वर्षे नगरसेविका होत्या. त्यांनी महापालिकेत विरोधी पक्षनेते पदही भूषविले. भाजप २०१७ मध्ये पुणे महापालिकेत पहिल्यांदा बहुमत मिळवून सत्तेवर आले त्यावेळी भाजपने पहिल्या महापौर म्हणून मुक्त टिळक यांची निवड केली. महापौर पद संपतानाच २०१९ मध्ये त्यांना भाजपने कसबा पेठ मतदारसंघातून विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी दिली. तेथून मोठ्या बहुमताने विजयी झाल्या. उद्या सकाळी ११ वाजता वैकुंठ स्मशान भूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
लोकमान्य टिळक यांच्या घराण्याच्या त्या स्नुषा होत. त्या लोकमान्य टिळकांचे पणतू शैलेश टिळक यांच्या पत्नी आहेत. त्यांचा जन्म ग्वाल्हेर येथे झाला होता.पुण्यातील कसबा पेठ मतदारसंघाच्या त्या भाजपच्या विद्यमान आमदार होत्या. भाजपच्या वरिष्ठ नेत्यांपैकी एक असलेल्या मुक्ता टिळक यांनी पुण्यात अनेक सामाजिक उपक्रम राबवले होते.