फाॅरेन रिटर्न तरुणी बनली गावची सर्वात तरुण कारभारीन
परदेशातील उच्च शिक्षण सोडून आलेल्या यशोधराची राजकारणात बाजी
सांगली दि २२(प्रतिनिधी)- सांगली जिल्ह्यातील मिरज तालुक्यामधील वड्डी गावातील तरुणी यशोधरा शिंदे मेडिकलचे शिक्षण घेण्यासाठी जॉर्जिया या देशात गेली होती. मेडिकल शिक्षण घेतलेली यशोधरा महेंद्रसिंह शिंदे ही सांगली ग्रामपंचायत निवडणुकीत सरपंचपदी निवडून आली आहे. यशोधरा शिंदे या सर्वात तरुण महिला सरपंच देखील ठरल्या आहेत. आता ही फाॅरेन रिटर्न तरुणी गावची कारभारीन झाली आहे.
वड्डी हे मिरज तालुक्यातील कर्नाटकच्या सीमेवर असलेले जवळपास पाच हजार लोकसंख्येचे छोटेसे गाव आहे. गावाचा म्हणावा तसा विकास झाला नाही, शुद्ध पिण्याचे पाणी, शिक्षण आरोग्य आणि नागरी सुविधा गावकऱ्यांपर्यंत पोहोचतच का नाहीत ? तसेच महिला आरोग्याचा मुद्दा उपस्थित करत यशोधरा शिंदे यंदा निवडणुकीच्या रिंगणार उतरली होती.रेणुका देवी ग्रामविकास सरकार पॅनलच्या माध्यमातून लढवलेल्या निवडणुकीमध्ये यशोधरा राजे शिंदे हिला यश देखील आले. तिने सत्ताधारी असणाऱ्या सत्ताधारी गटाच्या झाकीर वजीर यांचा १४९ मतांनी पराभव करत सरपंच पदाची माळ आपल्या गळ्यात पाडून घेतली. महत्वाचे म्हणजे तिचे पॅनल देखील निवडून आले आहे.या विजयानंतर बोलताना यशोधरा राजे शिंदे म्हणाली, राजकीय वारसा हा आपल्या घरामध्येच होता, त्यामुळे ही निवडणूक लढवताना फारशी अडचण आपल्याला आली नाही. घरच्यांचा पूर्ण आणि गावकऱ्यांचा देखील पाठिंबा होता, त्यामुळे हे निवडणूक जिंकणे फार अवघड गोष्ट नव्हती. पण माझ्या निवडीचे सर्व श्रेय हे कुटुंब आणि गावकऱ्यांना आहे. गावच्या विकासाच्या दृष्टीने आपण ज्या काही गोष्टी करायचे निश्चित केला आहे अशी प्रतिक्रिया शिंदे यांनी दिली आहे.
देशात बहुतांश तरुणांकडून राजकारणाकडे अनिच्छेने पाहिले जाते. तरुण पिढी राजकारणाबाबत उदासीन असल्याचे पाहायला मिळते. मात्र सांगलीतील यशोधराने जार्जियातील आपले वैद्यकीय शिक्षण अर्धवट सोडत गावच्या कारभाराची सूत्रे हातात घेत गावच्या विकासाचा संकल्प केला आहे.