देवेंद्र फडणवीसांकडून शिंदे गटाचा करेक्ट कार्यक्रम
भाजपने केली शिंदे गटाची कोंडी?, बंड करुनही शिंदे गटाच्या हाती भोपळाच
मुंबई दि १५(प्रतिनिधी)- एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली स्थापन झालेल्या भाजपा-शिवसेना युती सरकारचा पहिला अर्थसंकल्प अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत सादर केला. पण या ठिकाणीही पुन्हा एकदा भाजपाची मक्तेदारी दिसून आली. मुख्यमंत्री पद जरी शिंदे गटाकडे असले तरीही अर्थसंकल्पात मात्र शिंदे गटाच्या खात्यापेक्षा दुप्पट निधी भाजपाकडे असलेल्या खात्यांना मिळाला आहे.
यंदाच्या अर्थसंकल्पात घोषणांचा पाऊस पाडण्यात आला आहे. राज्यातील सिंचन प्रकल्पा संदर्भात महत्त्वाच्या घोषणा केल्या आहेत तर शेतकऱ्यांसाठीही नवीन मोठ्या योजना चालू करणार असल्याचे सांगितले आहे. अर्थसंकल्पात मुख्यमंत्री शिंदे आणि त्याच्या सहकारी शिवसेनेच्या मंत्र्यांच्या खात्यांना ३४ टक्के निधी देण्यात आला आहे. तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांचे सहकारी मंत्र्यांना तब्बल ६६ टक्के निधी देण्यात आला आहे. विशेष म्हणजे शिवसेनेतून एकनाथ शिंदे यांनी बंड केले त्यावेळी अजित पवार शिवसेनेच्या आमदारांना आणि मंत्र्यांना निधी देत नाहीत असा आरोप करण्यात आला होता. पण आता नव्या सरकारमध्येही शिंदे गटाच्या हाती भोपळाच मिळाला आहे. यंदाच्या अर्थसंकल्पात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे असलेल्या नगरविकास विभागाला ९ हजार ७२५ कोटी रुपयांचा निधी देण्यात आला आहे. मात्र इतर विभागांना मात्र डावलण्यात आले आहे.
महाविकास आघाडीचे सरकार असताना अर्थसंकल्पात ५७ टक्के बजेट राष्ट्रवादीला, २७ टक्के बजेट काँग्रेसला, तर केवळ १६ टक्के शिवसेनेला मिळत असल्याचा आरोप करण्यात आला होता. त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खात्यांना ३ लाख १४ हजार ८२० कोटी, काँग्रेसच्या खात्यांसाठी १ लाख ४४ हजार १९३ कोटी, तर शिवसेनेला ९० हजार १८१ कोटी रुपये निधी देण्यात आल्याचा दावा करण्यात आला होता.