अजित पवार समर्थक आमदारांची मुंबईत तातडीची बैठक?
राष्ट्रवादीच्या या दोन आमदारांचा अजित पवारांना पाठिंबा, अजित पवार भुमिका मांडताना म्हणाले...
मुंबई दि १७(प्रतिनिधी)- राज्याच्या राजकारणात गेल्या ८ दिवसांपासून अजित पवार आणि त्यांच्या भूमिकांविषयीच चर्चा सुरू आहे. त्यातच अजित पवार समर्थन आमदारांना तातडीने मुंबईत येण्याचे आदेश देण्यात आले आहेत. नेमक्या याच वेळी अजितदादा घेतील ती भुमिका मान्य असुन त्यांच्यासोबत भाजपात जाण्यास तयारी असल्याची उघड भुमिका राष्ट्रवादीच्या दोन आमदारांनी घेतली आहे.
राष्ट्रवादीचे आमदार माणिकराव कोकाटे यांनी राष्ट्रवादी शिवाय भाजपला पर्याय नाही असे विधान केले आहे. तर दुसरीकडे पवार जी भूमिका घेणार ती आम्हाला शंभर टक्के मान्य आहे, अशी भूमिका आमदार अण्णा बनसोडे यांनी मांडली आहे. कोकाटे आणि बनसोडे हे विरोधी पक्षनेते अजित पवार यांचे खंदे समर्थक आहेत. भाजपाला अपेक्षित यश मिळत नाही त्यामुळं राष्ट्रवादी हा भाजपसाठी पर्याय असणार आहे. राष्ट्रवादीला सोबत घेणे एवढा एकच पर्याय सध्या भाजपकडे आहे, आम्ही पक्षाचे आमदार आहोत पक्षश्रेष्ठी जो निर्णय देतील आम्ही त्यासोबत राहू अशी उघड भुमिका राष्ट्रवादीच्या आमदारांनी मांडल्याने राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगली आहे, पण या गदारोळात अजित पवार यांनी ट्विट करत आपली भुमिका मांडली आहे. माझा कोणताही नियोजित कार्यक्रम नव्हता. मी मुंबईतच आहे. उद्या मी विधानभवनातील माझ्या कार्यालयात उपस्थित राहणार असून कार्यालयाचे नियमित कामकाज सुरु राहणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे तर त्याचवेळी ”मंगळवारी मी आमदारांची बैठक बोलावल्याच्या बातम्या काही माध्यमातून प्रसिद्ध होत आहेत, त्या पूर्णत: असत्य आहेत. मी आमदार अथवा पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली नाही, याची नोंद घ्यावी,” असंही अजितदादा म्हणाले आहेत. पुढील काळात अजित पवार भाजपमध्ये जाणार की महाविकास आघाडीमध्येच असणार? हे अद्याप गुलदस्त्यातच असले तरी अजित पवार राज्याच्या राजकारणात केंद्रस्थानी आले आहेत.
मंगळवारी मी आमदारांची बैठक बोलावल्याच्या बातम्या काही माध्यमातून प्रसिद्ध होत आहेत, त्या पूर्णत: असत्य आहेत. मी आमदार अथवा पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली नाही, याची नोंद घ्यावी.
— Ajit Pawar (@AjitPawarSpeaks) April 17, 2023
दुसरीकडे अजित पवार यांना चर्चेत ठेवत ईडीच्या रडारवर असलेला राष्ट्रवादीचा एक गट भाजपा जाणार असल्याची चर्चा आता सुरु झाली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून वारंवार होणाऱ्या केंद्रीय तपास यंत्रणांच्या धाडींमुळे राष्ट्रवादीच्या गटात अस्वस्थता पसरली आहे. पण राष्ट्रवादीतील काही नेते भाजपात जाणार असुन, राष्ट्रवादी काँग्रेसला खिंडार पडणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.