
मुंबई दि ४(प्रतिनिधी)- देशात आणि महाराष्ट्रात सातत्याने विरोधी पक्षांच्या नेत्यांवर सरसकट ईडीची कारवाई केली जात आहे. याचा निषेध करण्यासाठी युवक काँग्रेसच्या एका कार्यकर्त्याने थेट मुंबईतील ईडी कार्यालयात घुसत ईडीच्या फलकाला काळे फासण्याचा पर्यंत केला. पोलीसांनी तात्काळ युवकाला ताब्यात घेतले आहे. सध्या या युवकाचा ईडी कार्यालयातील फलकाला काळे फासतानाचा व्हिडिओ सोशल मिडीयावर व्हायरल होत आहे.
नॅशनल हेरॉल्ड मनी लॉंड्रिंग प्रकरणी राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांची ईडीने चाैकशी केली होती. त्याचबरोबर यंग इंडीयाचे कार्यालय देखील सील करण्यात आले आहे. त्यामुळे देशभरातील काँग्रेसचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत.मागे सोनिया गांधी यांच्या चाैकशीच्या वेळी देखील देशभरात विविध ठिकाणी आंदोलने करण्यात आली होती. आता या कारवाईचा विरोध करण्यासाठी एका युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्याने थेट ईडीच्या कार्यालयात घुसत फलकाला काळे फासण्याचा प्रयत्न केला. पोलीसांनी तात्काळ हस्तक्षेप करत त्या युवकाला ताब्यात घेतले. पोलीस घेऊन जात असताना त्याने ईडीच्या कारवाईचा निषेध करत युवक काँग्रेसच्या समर्थनात घोषणाबाजी केली. केंद्रात मोदी सरकार सत्तेत आल्यानंतर विरोधी पक्षांच्या नेत्यावर ईडीच्या कारवाया होत आहेत. सुडबुद्धीने ही कारवाई केली जात असल्याचा आरोप विरोधी पक्षाकडून केला जातो, तर सत्ताधारी पक्ष ईडी स्वायत्त संस्था असल्याचा दाखला दिला जातो.
देशाबरोबर महाराष्ट्रात देखील ईडीने विरोधी पक्षांच्या नेत्यांवर कारवाई करत अनिल देशमुख, नवाब मलिक, संजय राऊत यांना अटक केली आहे.तर अनेक नेत्यांना समन्स बजावण्यात आले आहे. पण हे सर्व होत असताना सत्ताधारी भाजपाच्या एकाही नेत्यावर ईडीची कारवाई होत नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.