पुणे : इंस्टाग्रामवरील ओळखीतून विवाहितेचे एका तरुणावर प्रेम बसले. नातेवाईकांनी समज दिल्यानंतर तिने त्याला नकार दिला. तरीही तो मजनू तिच्या घरी आला.तेव्हा तिने विरोध करताच तिच्यावर चाकूने वार केला. प्रेमात अडथळा होणार्या १३ वर्षाच्या मुलाच्या गळ्यावर वार करुन त्याच्या खूनाचा प्रयत्न केला . हडपसर पोलिसांनी फलटणहून या मजनूला अटक केली आहे.
सागर सुर्वे (वय ३०, रा. साखरगाव, ता. फलटण, जि. सातारा) असे या मजनूचे नाव आहे. याबाबत एका ३५ वर्षाच्या महिलेने हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ही घटना हडपसरमधील ससाणेनगर ) येथे गुरुवारी ३१ जुलै रोजी सकाळी साडेअकरा वाजता घडली. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि आरोपी यांची दोन वर्षापूर्वी इन्स्ट्राग्रामवर ओळख होऊन प्रेमात रुपांतर झाले होते. ही बाब फिर्यादी यांच्या भाच्याला कळली. तेव्हा त्याने दोघांना समज दिली. त्यानंतर फिर्यादी यांनी सागरशी संबंध तोडले. तरीही तो वारंवार फिर्यादीला फोन करत. घरी भेटायला येत. तेव्हा फिर्यादी यांनी आपल्यामध्ये कोणते संबंध ठेवू नको, असे सांगून त्याला परत पाठवून दिले होते.
तरीही ३१ जुलै रोजी तो पुन्हा घरी आला. तेव्हा फिर्यादीचा १३ वर्षाचा मुलगा घरी होता. त्याने फोन करुन फिर्यादीला बोलावले. फिर्यादी यांनी त्याला निघून जाण्यास सांगितले. तरीही सागर हा तिला माझ्यासोबत चल, नाही तर तुझा जीव घेईल असे बोलून त्याने फिर्यादीवर चाकूने वार करण्याचा प्रयत्न केला. या झटापटीमध्ये चाकू फिर्यादीच्या हनुवटीला लागून खाली पडला. तो चाकू सागरने घेऊन फिर्यादीच्या मुलाजवळ गेला व फिर्यादीला म्हणाला, तुझी मुले आपल्या प्रेमात अडथळा करत आहेत, आता तुझ्या मुलाचा जीव घेतो, असे बोलून चाकूने मुलाच्या गळ्यावर वार करुन तो पळून गेला. मुलाला तातडीने रुग्णालयात उपचार करण्यात आल्याने त्याचा जीव वाचला आहे. या घटनेची माहिती मिळताच हडपसर पोलिसांनी एक पथक फलटणलाा पाठवून सागर सुर्वे याला अटक केली आहे. सहायक पोलीस निरीक्षक अब्दागिरे तपास करीत आहेत.