दारूबंदी असलेल्या जिल्ह्यात बिअरचा ट्रक उलटला
बिअरच्या बाटल्यासाठी नागरिकांची झुंबड, बिअर पळवतानाचा व्हिडिओ व्हायरल
वर्धा दि १(प्रतिनिधी)- शिर्डी-नागपूर समृद्धी महामार्गावर अपघातांची मालिका सुरुच आहे. समृद्धी महामार्गावरील वर्धा येथे विचित्र अपघात घडला आहे.वर्धा हा जिल्हा दारूबंदीसाठी ओळखला जातो. पण आज त्याच वर्ध्यात बिअरचा ट्रक पलटी झाला त्यामुळे बिअरच्या बाटल्या गोळा करण्यासाठी नागरिकांची झुंबड उडाली होती.
नागपुरच्या वाडी येथील निशा ट्रान्सपोर्ट कंपनीचा ट्रक औरंगाबाद येथील एमआयडीसीतून बियरचे बॉक्स घेऊन नागपूरच्या दिशेने जात होता. दरम्यान ट्रकच्या समोर समृद्धी महामार्गावरील वर्धा जिल्ह्यातील महाकाळ शिवारात अचानक मोठी निलगाय आडवी आली. यावेळी ट्रक चालकाने निलगायीला वाचविण्यासाठी करकचून ब्रेक मारला. मात्र यात ट्रक रस्त्याच्या शेजारील खोलगट भागात पलटी झाला. बियरचा ट्रक पलटल्याची वार्ता कानी पडताच परिसरातील नागरिकांनी सकाळी घटनास्थळी धाव घेत मिळेल तेवढ्या बियरच्या बाटल्या लंपास केल्या. दारुबंदी असलेल्या जिल्ह्यात बियरचा ट्रक उलटल्याने तळीरामांना लॉटरी लागल्यासारखेच वाटले. बियरच्या बॉटल गोळा करण्यासाठी नागरिकांनी तुफान गर्दी गेली होती. जास्तीत जास्त बॉटल गोळा करण्याचा प्रयत्न नागिकांनी केला. याचा व्हिडिओही व्हायरल झाला आहे. या घटनेत अंदाजे नऊ ते दहा लाख रुपयांचे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती आहे. सुदैवाने कोणालाही इजा झाली नाही. घटनेची माहिती मिळताच सेलू पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा केला.
समृद्धी महामार्गावरील अपघाताचे प्रमाण कमी करण्यासाठी परिवहन विभागाने विविध उपाययोजना केल्या आहेत. टायर कालबाह्य झालेल्या वाहनांना समृद्धी महामार्गावर धावू न देता परत पाठवले जाणार आहे. तर एक्झिट मॅनेजमेंट सिस्टीमच्याद्वारे वाहनांच्या ओहरस्पीडवर नजर ठेवण्यात येते.