
चित्रपटामध्ये आपण पाहतो की कशा प्रकारे एखादा गुन्हा लपवण्यासाठी मृतदेह जमिनीखाली गाडला जातो. मात्र, बुलढाणा जिल्ह्याच्या मेहकर तालुक्यात याहूनही धक्कादायक वास्तव समोर आले आहे. एका व्यक्तीने ४ वर्षांपूर्वी एका तरुणाची हत्या करून त्याचा मृतदेह हॉटेलमध्येच गाडून टाकला होता. मात्र, नियतीचा न्याय बघा, ज्या पत्नीसमोर पतीने हा गुन्हा कबूल केला होता, त्याच पत्नीने घरगुती वादातून पोलिसांत तक्रार केली आणि या थरारक हत्याकांडाचा उलगडा झाला

काय आहे नेमकं प्रकरण?

मे २०२२ मध्ये विनोद अश्रुबा नवले (वय ३४) या तरुणाची निर्घृण हत्या करण्यात आली होती. आरोपी सचिन ज्ञानेश्वर उगले आणि त्याचा साथीदार सुनील बाजीराव जाधव यांनी मिळून हा कट रचला होता. मेहकर ते मोळा रोडवर असलेल्या ‘हॉटेल पैलवान’मध्ये विनोदला आधी मद्यप्राशन करून देण्यात आले. त्यानंतर दारूच्या नशेत झालेल्या वादातून धारदार कात्री आणि चाकूने विनोदच्या गळ्यावर व छातीवर वार करून त्याची हत्या करण्यात आली.

पुराव्यांची अशी केली विल्हेवाट
हत्येचा पुरावा नष्ट करण्यासाठी आरोपींनी ‘दृश्यम’ चित्रपटाची स्टाईल वापरली. हॉटेलच्या मागे खड्डा खोदून विनोदचा मृतदेह त्यात पुरण्यात आला. इतकेच नाही तर त्यावर सिमेंटचा कोबा करून टाकला, जेणेकरून कोणालाही संशय येऊ नये. गेल्या ४ वर्षांपासून हे गुपित जमिनीखाली गाडलेले होते आणि पोलीसही या प्रकरणापासून अनभिज्ञ होते.
बायकोशी वाद अन् पापाचा घडा भरला!
१७ एप्रिल रोजी आरोपी सचिन उगले याची पत्नी घरगुती त्रासामुळे पोलिसांत तक्रार देण्यासाठी पोहोचली. तक्रार नोंदवताना तिने पोलिसांसमोर एक खळबळजनक संशय व्यक्त केला. तिने सांगितले की, तिचा पती आणि त्याचा मित्र सुनील जाधव यांनी ४ वर्षांपूर्वी सुकळी गावातील एका व्यक्तीचा घातपात केला असावा. या माहितीनंतर मेहकर पोलिसांनी चक्रे फिरवली. पोलीस आपला शोध घेत आहेत हे लक्षात येताच आरोपी सचिन उगले याने स्वतः पोलीस ठाण्यात हजर होऊन गुन्ह्याची कबुली दिली.
फॉरेन्सिक तज्ज्ञांच्या उपस्थितीत सांगाडा बाहेर काढला
आरोपीने दिलेल्या माहितीनुसार, पोलिसांनी जामगाव शिवारातील त्या हॉटेलच्या जागी धाव घेतली. फॉरेन्सिक तज्ज्ञांच्या उपस्थितीत सिमेंटचा कोबा फोडून खोदकाम करण्यात आले. तेव्हा तिथे एक मानवी सांगाडा आढळून आला, जो मृत विनोद नवले यांचा असल्याचे स्पष्ट झाले.
दोन्ही आरोपींना बेड्या
या प्रकरणी मृताचा भाऊ मनोज अश्रुबा उगले यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी सचिन उगले आणि सुनील जाधव या दोन्ही आरोपींविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली आहे. हत्येचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसले तरी, दारूच्या नशेत झालेल्या वादातून हा प्रकार घडल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

