Latest Marathi News
Ganesh J GIF

हडपसरमध्ये अमली पदार्थविरोधी पथकाची मोठी कारवाई; तुकाई टेकडी परिसरातून दोघांना अटक, ७३ हजारांचा गांजा जप्त

जामिनावर बाहेर आल्यानंतर पुन्हा संघटित पद्धतीने गांजाविक्रीचे जाळे चालवणाऱ्या दोन आरोपींच्या मुसक्या आवळण्यात गुन्हे शाखेच्या ‘अमली पदार्थविरोधी पथक-२’ला यश आले आहे. हडपसर येथील तुकाई टेकडी परिसरात सापळा रचून पोलिसांनी ही धडक कारवाई केली. या कारवाईदरम्यान तब्बल ७३ हजार ८०० रुपयांचा गांजा आणि इतर मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

धाडीदरम्यान ८४ ग्राहक रंगेहाथ सापडले

पोलिसांची कारवाई सुरू असतानाच त्या ठिकाणी गांजा खरेदी करण्यासाठी आलेले तब्बल ८४ तरुण/ग्राहक घटनास्थळी आढळल्याने मोठी खळबळ उडाली. पोलिसांनी या सर्व ८४ जणांचे तात्काळ समुपदेशन (Counseling) केले असून, पुढील कारवाईसाठी त्यांना फुरसुंगी पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.स्वप्नील दयानंद गंधारे (वय २२) व प्रतीक बाळू गाडे (वय २२, रा. ओंकार कॉलनी, तुकाई दर्शन, हडपसर) या दोघांविरुद्ध फुरसुंगी पोलीस ठाण्यात अमली पदार्थ प्रतिबंधक कायद्यान्वये (NDPS Act) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गोपनीय माहितीवरून रचला सापळा

जामिनावर बाहेर आलेला आरोपी काही तरुणांच्या मदतीने शहरात पुन्हा गांजाचे रॅकेट चालवत असल्याची गोपनीय माहिती ‘अमली पदार्थविरोधी पथक-२’ला मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी तुकाई टेकडी परिसरात सापळा रचून या दोघांना रंगेहाथ पकडले.सध्या पोलीस या रॅकेटची पुरवठा साखळी (Supply Chain), आरोपींचे आर्थिक व्यवहार आणि यात सहभागी असलेल्या इतर संशयितांचा सखोल तपास करत आहेत.

या अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली झाली कारवाई

ही धडक कारवाई अतिरिक्त पोलीस आयुक्त (गुन्हे) तेजस्वी सातपुते, अतिरिक्त पोलीस आयुक्त मनोज पाटील, पोलीस उपायुक्त (गुन्हे) गौहर हसन, सहायक पोलीस आयुक्त शंकर खटके आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक जीवन माने यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक अफरोज पठाण, नितीनकुमार नाईक व त्यांच्या पथकाने केली.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!