पुणे दि ३(प्रतिनिधी) – पुण्यात आग लागण्याच्या घटना वाढल्या आहेत. पुण्यातील वडगाव शेरी परिसरामध्ये भीषण आगीची घटना घडली आहे. एका गोदामाला अचानक भीषण आग लागली. या आगीनंतर सिलेंडरचे स्फोट झाल्याची माहिती समोर आली आहे. सुदैवाने या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही. सध्या अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरु आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, पुणे- नगर रस्ता मार्गावर वडगाव शेरी परिसरातील सोपान नगरमध्ये ही आगीची घटना घडली आहे. सोपन नगरमधील स्क्रॅप गोडाऊनला ही आग लागली आहे. महत्वाचे म्हणजे या ठिकाणी ३ कुटुंब राहत होती. पण त्यांना सुखरुपपणे बाहेर काढण्यात आले आहे. त्यामुळे जिवीतहानी टळली आहे. स्क्रॅपच्या गोडाऊनमध्ये सिलेंडर होते. एकापाठोपाठ अनेक सिलेंडरचा स्फोट झाला. त्यामुळे आगीचा भडका उडाला होता. आगीची माहिती मिळताच घटनास्थळी अग्निशमन दलाकडून ५ वाहने दाखल झाली. आग विझवण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे.

पुण्यामध्ये अलीकडे आगीच्या घटनांमध्ये वाढ झाली असून दोन दिवसापुर्वीच एका हाॅटेलला आग लागली होती. त्याचबरोबर येरवड्यात शिवशाही बसला देखील आग लागली होती. दिवाळीच्या काळात देखील फटाक्यांमुळे मोठ्या प्रमाणात आगीच्या घटना घडल्या होत्या. सध्या आग लागल्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.