भाजपा आमदार नावाने भरवलेल्या बैलगाडा शर्यतीत गदा चोरीला
अंधाराचा फायदा घेत चोरट्याने केला हात साफ, गोंधळाच्या व्हिडीओत गदाचोरची घोषणाबाजी
कल्याण दि २५(प्रतिनिधी)- कल्याण पूर्वेतील खरड गावात भाजप आमदार गणपत गायकवाड यांच्या नावाने आमदार केसरी बैलगाडा शर्यतींचे आयोजन करण्यात आले होते. मात्र बक्षीस वितरणाच्या दरम्यान गदा पळवण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. अंधाराचा फायदा घेत थेट मंचावरुन चोरट्यांनी आपला हात साफ करत तब्बल दहा ते बारा गदा चोरुन नेल्या.
न्यायालयाच्या निर्णयामुळे महाराष्ट्रात बैलगाडा शर्यत सुरु आहे. मलंगगड भागातील खरड गावात आमदार केसरी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. काकडवाल गावातील निलेश कान्हा पावशे यांनी या स्पर्धेचे आयोजन केले होते. ही स्पर्धा उशीरा सुरु झाल्याने रात्री उशिरापर्यंत स्पर्धा सुरु होती. रात्रीचा अंधार पडल्याचा फायदा चोरट्यांनी घेत थेट मंचावरून बक्षिसांच्या रुपात ठेवलेली गदाच या चोरट्यांनी चोरुन नेली आहे. यानंतर आयोजकांनी गदा चोर म्हणत, ज्यांनी कोणी गदा चोरली ती परत आणून द्या, असे आवाहन करण्यास सुरुवात केली. मात्र, चोरटयांनी चोरलेल्या गदा परत केलेली नाही. याचा व्हिडीओ सध्या सोशल मिडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. बैलगाडा शर्यतीच्या स्टेजवरून दहा ते बारा गदा पळवण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. पण स्पर्धेत गदाचोराची चांगलीच चर्चा रंगली होती.
स्पर्धेच्या ठिकाणी पोलिस बंदोबस्त, आयोजक, कार्यकर्ते यांची उपस्थिती असतानाही हा प्रकार घडल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. मात्र या बाबत अद्याप हिललाईन पोलिस ठाण्यात कोणत्याही प्रकारची तक्रार दाखल करण्यात आली नसल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.