‘राष्ट्रवादी काँग्रेसचा एक नेता लवकरच जेलमध्ये जाणार’
भाजप नेत्याच्या ट्विटमुळे राष्ट्रवादीच्या गोटात खळबळ
मुंबई दि १७ (प्रतिनिधी)- राष्ट्रवादी काँग्रेसचा एक नेता लवकरच अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांना भेटायला जाईल असे खळबळजनक ट्विट भाजपाचे नेते मोहित कंबोज यांनी केले आहे. शिवाय आपण लवकरच याबाबत खुलासा करणारी पत्रकार परिषद घेऊ असेही ट्विट कंबोज यांनी केले आहे. त्यामुळे खरच राष्ट्रवादीचा एक नेता जेलमध्ये जाणार की अधिवेशनात राष्ट्रवादीला बॅकफुटवर टाकण्यासाठी केलेली खेळी हे गुलदस्त्यात आहे.
एकामागून एक ट्विट करत कंबोज यांनी राजकीय खळबळ उडवून दिली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या बड्या नेत्याचा भांडाफोड करणार, संबंधित नेत्याची भारतातील आणि परदेशातील संपत्ती, बेनामी कंपन्या, त्या नेत्याच्या मैत्रिणीच्या नावावर असलेली संपत्ती, विविध खात्यामध्ये मंत्री म्हणून काम करत असताना भ्रष्टाचार, त्या नेत्याच्या कुटुंबाचं उत्पन्न आणि संपत्तीची यादी पत्रकार परिषदेतून जाहीर करणार असल्याचं कंबोज यांनी म्हटलं आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचा एक नेता लवकरच अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांना भेटायला जाईल, असं ट्विट कंबोज यांनी केले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचा तो नेता नेमका कोण असेल याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा सुरु झाल्या आहेत. कंबोज यांच्या ट्विटचा रोख अजित पवारांकडे असल्याची चर्चा आहे. कारण कंबोज यांनी २०१९ मध्ये परमबीर सिंग यांनी बंद केलेल्या सिंचन घोटाळा प्रकरणाची चौकशी पुन्हा सुरु करण्याची मागणी शिंदे फडणवीस सरकारकडे केली आहे. राष्ट्रवादीकडून यावर अद्याप कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही.

Save This Tweet :-
One NCP Big – Big Leader Will Meet Nawab Malik & Anil Deshmukh Soon !
— Mohit Kamboj Bharatiya (@mohitbharatiya_) August 16, 2022
आजपासून राज्यात विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरु होत आहे. शिवसेना अंतर्गत कलहामुळॆ दुबळी झाली आहे तर काँग्रेसकडून फार अपेक्षा नाहीत त्यामुळे सरकारला घेरण्याची पूर्ण जबाबदारी राष्ट्रवादीवर होती तसा इशाराही अजित पवार यांनी दिला होता. पण या ट्विटमुळे राष्ट्रवादी बॅकफूटवर जाण्याची शक्यता आहे.