आमदार योगेश कदम यांच्या कार अपघात प्रकरणात नवा ट्विस्ट
घातपाताचा संशय व्यक्त करत आमदार म्हणाले तर आज योगेश कदम नसता ...
रत्नागिरी दि ७ (प्रतिनिधी)- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील बाळासाहेबांची शिवसेना या पक्षाचे दापोली खेड मंडणगड विधानसभा मतदारसंघाचे आमदार योगेश कदम यांच्या कारला शुक्रवारी रात्री अपघात झाला. मात्र हा घातपात असल्याचा संशय खुद्द आमदार कदम यांच्या कार्यकर्त्यांकडून केला जात आहे. योगेश कदम यांना वाय प्लस दर्जाची सुरक्षा असताना त्यांच्या ताफ्यात डंपर शिरला कसा? असा प्रश्न उपस्थित केला आहे. विशेष म्हणजे डंपर चालक फरार झाला आहे.
आमदार योगेश कदम हे शुक्रवारी रात्री मतदारसंघातील आपले कार्यक्रम आटोपून मुंबईच्या दिशेला जात असताना १० वाजता सुमारास कशेडी घाटात डंपर कदम यांच्या कारला पाठीमागून धडक दिल्याने हा अपघात झाला. अपघातानंतर टँकर पलटी झाला असून टँकरचालक फरार झाला आहे. योगेश कदम म्हणाले की, अपघात सामान्य अपघातासारखा नव्हता. पोलीस यंत्रणेला मी तक्रार दिली आहे. पोलीस अधिकारी तपास करतील. ज्या शंका मला वाटतात त्या पोलिसांना सांगितल्या आहेत. माझ्या मागे आणि पुढे पोलिसांची गाडी असताना डंपर माझ्या कारला धडकला. १०० च्या वर त्या डंपरचं स्पीड होते. माझ्या कारचा मागचा भाग पूर्णपणे चक्काचूर झाला आहे. हा घातपात आहे की नाही याची खात्री करणं गरजेचे आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे चौकशी करण्याची मागणी करणार आहे असं आमदार योगेश कदम यांनी म्हटले आहे. सुदैवाने आमदार कदम आणि त्यांचे सहकारी या अपघातातून सुखरूप बचावले आहेत. कदम यांचे चालक दीपक कदम आणि सुरक्षेसाठी असलेल्या दोन पोलिसांना किरकोळ जखम झाली आहेत.
या अपघातानंतर आमदार योगेश कदम यांनी आपली पहिली प्रतिक्रिया दिली. ‘मी सुखरूप आहे, काळजी करू नका,’ असं आवाहन कदम यांनी आपल्या कार्यकर्त्यांना केलं. आई जगदंबेच्या कृपेने आम्ही सर्व सुखरूप असल्याचा संदेश त्यांनी व्हिडिओ शेअर करून दिला आहे. तसंच माझे पुढील कार्यक्रम ठरल्यानुसार होतील, अशी माहितीही त्यांनी दिली.