
अजित पवार आणि एकनाथ शिंदे गटात जोरदार राडा
महापालिका निवडणूकीआधी दोन्ही गट आक्रमक, शिंदे आणि पवारांच्या वादात भाजपाचा फायदा?
पुणे – गेल्या काही दिवसांपासून महायुतीमधील वाद चव्हाट्यावर येऊ लागले आहेत. राज्यात एकिकडे शिंदे गटाचे नेते उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर नाराजी आहेत. सत्तेत ते एकत्र असले तरी दोघांमधील वादाचे लोन आता थेट कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचले आहे. पुण्यात तर शिंदे आणि पवार समर्थक यांच्यात जोरदार राडा झाला आहे.
अजित पवार यांची राष्ट्रवादी आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे नेतृत्व करत असलेल्या शिवसेनेमध्ये सारं काही अलबेल नसल्याचे चित्र आहे. पुण्यातील धनकवडी-सहकारनगर क्षेत्रीय कार्यालयात आयोजित मोहल्ला कमिटीच्या बैठकीदरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे शहराध्यक्ष सुभाष जगताप आणि एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे पदाधिकारी उद्धव कांबळे यांच्यात जोरदार बाचाबाची झाली आहे. बैठकीदरम्यान स्थानिक पायाभूत सुविधा, कचरा व्यवस्थापन आणि अनधिकृत बांधकामासंदर्भात चर्चा सुरू असताना पद्मावती भागातील एका सोसायटीच्या महिला पदाधिकाऱ्याने सोसायटीच्या बाजूला झोपडपट्टी असून अवैध धंदे चालतात असा दावा ठोकत ते बंद करण्याची मागणी केली.यावळी शिवसेनेचे पदाधिकारी उद्धव कांबळे यांनी हस्तक्षेप केला असता सुभाष जगताप यांनी त्यांना बोलण्यास नकार दिला. पण काही वेळानंतर पुन्हा कांबळे बोलण्यास सुरुवात केली तेव्हा त्यांनी समस्येवर भाष्य न करत जगताप यांच्यावर आरोप केले. अवैध धंदे सुरु असणारी जागा सुभाष जगताप यांचीच होती असा दावा केला. त्यावेळी दोघांमध्ये आपरो प्रत्यारोप रंगले. दोघांमध्ये शाब्दिक चकमक पाहायला मिळाली. त्यावर पोलिसांनी हस्तक्षेप करत वाद मिटवला. परिस्थिती तणावपूर्ण होऊ नये म्हणून उपस्थित महापालिका अधिकाऱ्यांनी मध्यस्थी करत बैठक शांततेत पुढे नेण्याचा प्रयत्न केला. पण महापालिका निवडणूकीआधी अशी घटना समोर आल्याने स्थानिक निवडणूका युतीत लढण्यापेक्षा तिन्ही पक्ष स्वबळावर लढवणार याबाबत शंका निर्माण झाली आहे. या वादाचे लोण स्थानिक पातळीवर राहणार की वरिष्ठ पातळीवरही यावर प्रतिक्रिया उमटणार का? हे पाहणे आता महत्वाचे ठरणार आहे.
वैयक्तिक संदर्भातून हा वाद झाला आहे. त्याच्याशी महापालिकेच्या कामाचा काहीही सबंध नव्हता. उलट आज बैठक खूपच सकारात्मक झाली, असे सहाय्यक आयुक्त सुरेखा भणगे यांनी सांगितले आहे. दरम्यान शिंदे गट आणि पवार गट महापालिका निवडणूका स्वबळावर लढण्याची तयारी करत असून तशी पावले उचलण्यास सुरुवात झाली आहे.