
बांधकाम साईटवर बांधलेल्या पाण्याच्या टाकीत पडून दोन वर्षाच्या चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना लोणी काळभोर येथील रायवाडी रोडवरील गणेश खेडेकर यांच्या बांधकाम साईटवर 6 एप्रिल रोजी सकाळी पावणे बाराच्या सुमारास घडली.याप्रकरणी लोणी काळभोर पोलिसांनी ठेकेदारावर गुन्हा दाखल केला आहे.
प्रिन्स चंद्रकुमार कोशले (वय-2) असे मृत्यू झालेल्या मुलाचे नाव आहे. याप्रकरणी बापु शिवराम माने (वय-44 रा. साठेवस्ती, लोणी काळभोर, ता. हवेली) याच्यावर आयपीसी 304(अ) नुसार गुन्हा दाखल केला आहे. याबाबत पोलीस हवालदार विजय नथु जाधव यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रायवाडी रोडवर गणेश खेडेकर यांचे बांधकाम सुरु आहे.आरोपी बापु माने हा बांधकाम साईटवर ठेकेदार म्हणून काम करतो.माने याने घराच्या कन्स्ट्रशन साईटवर काम करताना दुर्लक्ष करुन निष्काळजीपणे जमिनीमध्ये पाण्याची टाकी बांधली.मात्र पाण्याच्या टाकीवर झाकण टाकले नाही.मृत प्रिन्स खेळत असताना झाकण नसलेल्या पाण्याच्या टाकीत पडला.टाकीत असलेल्या पाण्यात बुडून प्रिन्सचा दुर्दैवी मृत्यू झाला. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक तरटे करीत आहेत.