भारतात जातीव्यवस्थेची मूळं किती घट्ट रोवलेली आहेत. याची साक्ष देणारी घटना छत्रपती संभाजीनगरमधून समोर आली आहे. आंतरजातीय प्रेमविवाह केल्याच्या रागातून तरूणाची निघृण हत्या करण्यात आली आहे.अमित साळुंखे आणि विद्या किर्तीशाही या दोघांनी प्रेमविवाह केला. सुखी संसाराची स्वप्न पाहिली. पण ही सगळी स्वप्न आता धुळीस मिळाली आहेत. कारण विद्याच्या कुटुंबियांनी अमितची हत्या केली आहे. या घटनेने केवळ छत्रपती संभाजीनगरच नव्हे तर महाराष्ट्र हादरला आहे.विद्या आणि अमित… दोघेही एकाच गावचे… लहानपणापासून दोघे एकत्र वाढले. पुढे या दोघांचं एकमेकांवर प्रेम जडलं. विद्याच्या घरच्यांनी तिच्या लग्नासाठी मुलगा बघायला सुरुवात केली. पण या दोघांचं एकमेकांवर जीवापाड प्रेम होतं. म्हणून पुण्यात येत या दोघांनी लग्न केलं. रजिस्टर मॅरेज केलं. पण लग्नाला एक महिना होताच अमित साळुंखेची हत्या केली गेली अन् ती हत्यादेखील विद्याच्या भावानेच केली आहे.
संध्याकाळच्या वेळी अमित पबजी गेम खेळत होता. इतक्यात गावातील मुलांनी पबजीवरच त्याला घराबाहेर बोलावून घेतलं. अमित हातात मोबाईल घेत बाहेर गेला. घराजवळच्या झालाखाली तो त्या मुलांसोबत जाऊन बसला. इतक्यात गावातली लाईट गेली अन् अमितवर सपासप वार झाले. क्षणार्धात अमितचा देह रत्नाने माखला. त्याच्या पोटात चाकूने वार केला गेला. त्याचे आतडेपण पोटाच्या बाहेर आले. अमितचा आवाज घरच्यांना आला. त्याचा भाऊ पळत झाडाच्या दिशेने गेला. त्याने पाहिलं तर अमित रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. अमितला दवाखान्यात नेण्यात आलं. पण उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. 14 जुलैला ही घटना घडली आहे. अमितची हत्या करणाऱ्या माझ्या भावाला आणि वडिलांना कठोरात कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी विद्याने केलीय.
अमित साळुंखे हा गोंधळी समाजाचा आहे. तर विद्या किर्तीशाही ही बौद्ध समाजाची… या दोघांनी आंतरधर्मीय विवाह केला. पण आपल्या समाजात जाती व्यवस्थेची पाळमुळं खोलवर रोवलेली आहेत. यात जातीव्यवस्थेने अमितचा जीव घेतला. आंतरधर्मीय लग्न केल्याच्या रागातून विद्याच्या घरच्यांनी अमितची हत्या केली. अमितच्या हत्येने अनेक सवाल निर्माण झालेत. ज्या बाबासाहेब आंबेडकरांनी जातीव्यवस्था नाकारली. त्यांच्या विचारांना मानणाऱ्या, त्यांनी सांगितलेल्या मार्गावर चालणाऱ्या अनुयायांनी जातीभेदामुळे आपल्याच मुलीच्या पतीची हत्या करावी? आपली जात आपल्याच मुलीच्या सुखाच्या आड यावी?