
शेजारील घरात भांडणे सुरु असताना आवाज कमी करा, असे सांगण्यास गेलेल्या तरुणावर चाकूने वार करुन गंभीर जखमी करण्याचा प्रकार कोथरुडमध्ये घडला.या घटनेत कुणाल उभे (वय २६, रा.मोकाटे चाळ, सागर कॉलनी, शास्त्रीनगर, कोथरुड) हे गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना बुधवारी रात्री साडेबारा वाजता घडली.याबाबत रसिका कुणाल उभे (वय २४, रा. शास्त्रीनगर) यांनी कोथरुड पोलिस ठाण्यात फिर्याद (गु. रजि. नं. २१६/२४) फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी सौरभ वकील यादव (वय २०, रा. मोकाटे चाळ, शास्त्रीनगर) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उभे आणि यादव हे शेजारी शेजारी राहतात. यादव याच्या घरात मध्यरात्री साडेबारा भांडणे चालली होती. त्यामुळे उभे यांना आपल्या घरात झोपणे शक्य होत नव्हते. तेव्हा कुणाल उभे हे शेजारी राहणार्या यादव यांच्याकडे गेले. त्यांनी भांडणाचा आवाज कमी करा असे सांगितले. आधीच भांडणात रागावलेल्या सौरभ याने घरातील चाकूने कुणाल उभे यांच्या मानेवर, पाठीत, खांद्यावर, ओटी पोटात चाकूने सपासप वार करुन गंभीर जखमी केले. कुणाल यांच्यावर उपचार करण्यात येत असून पोलीस उपनिरीक्षक माळी अधिक तपास करीत आहे.