कारेगाव येथे किरकोळ वादातून एका व्यक्तीने बाजारात पायी चाललेल्या युवकाच्या पाठीमागून कोयत्याने मारहाण करत दुखापत केली. स्वतःचा जीव वाचविण्यासाठी तो युवक पळून जाताना कोयता फेकून मारल्याची गंभीर घटना शनिवार (दि २९) रोजी घडली आहे.याबाबत अक्षय रामदास शिवले याने रांजणगाव एम.आय.डी.सी. पोलिस स्टेशनला फिर्याद दिली असून निखिल रामचंद्र वीडगीर याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत रांजणगाव एम.आय.डी.सी. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी अक्षय शिवले हा शनिवार (दि. २९) रोजी बाभुळसर रस्त्यावर असलेल्या एका इमारतीमधील चिकन शॉपच्या जवळून आपल्या दोन मित्रांसह कारेगाव येथील बाजारात पायी जात होता. यावेळी दुपारी झालेल्या वादाच्या कारणावरुन निखिल याने चिकन शॉपच्या दुकानातील कोयता घेऊन फिर्यादीच्या पाठीमागून येऊन त्याच्या पाठीच्या डाव्या बाजूस मारुन दुखापत केली.
त्यावेळी फिर्यादी तेथून पळून जाऊ लागला. तेव्हा निखिल याने त्याच्या हातातील कोयता फिर्यादीच्या दिशेला फेकत शिवीगाळ करुन जीवे मारण्याची धमकी दिली. त्यामुळे अक्षय रामदास शिवले (वय २६, ) याने रांजणगाव एम.आय.डी.सी. पोलिस स्टेशन येथे निखिल रामचंद्र वीडगीर याच्या विरोधात फिर्याद दिल्याने निखिल वीडगीर याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस निरीक्षक महादेव वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार गणेश आगलावे या घटनेचा पुढील अधिक तपास करत आहेत.