कर्वेनगर येथून अल्पवयीन मुलाकडून गावठी पिस्तुल जप्त ; ४० हजार रुपयांचे पिस्तुल व एक जिवंत काडतुस पोलिसांनी केले जप्त
कर्वेनगर येथील कॅनॉल रोडवर उभ्या असलेल्या अल्पवयीन मुलाकडून गुन्हे शाखेच्या युनिट ३ च्या पथकाने गावठी पिस्तुल जप्त केले आहे. वारजे माळवाडी परिसरात सहायक पोलीस निरीक्षक ढवळे, पोलीस अंमलदार शिंदे, भंडलकर व इतर सहकारी गस्त घालत असताना एक अल्पवयीन मुलगा कॅनॉल रोडला पिस्तुल घेऊन उभा असल्याची माहिती मिळाली.
त्याबातमीनुसार पोलिसांनी जाऊन अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले. त्याच्या अंगझडतीत ४० हजार रुपयांचे पिस्तुल जप्त करण्यात आले आहे. ही कामगिरी सहायक पोलीस आयुक्त गणेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक रंगराव पवार व त्यांच्या सहकार्यांनी केली आहे. वारजे माळवाडी पोलिसांनी म्हाडा वसाहतीतून एका तरुणाकडून गावठी पिस्तुल व एक जिवंत काडतुस असा ४० हजार १०० रुपयांचा माल जप्त केला आहे.
सहायक पोलीस निरीक्षक रणजित मोहिते, पोलीस अंमलदार मनोज पवार, विजय भुरुक, संभाजी दरोडे, विक्रम खिलारी, विकास पोकळे हे सराईत गुन्हेगार तपासत असताना त्यांना माहिती मिळाली की, म्हाडा वसाहतीत एक जण कमरेला पिस्तुल लावून फिरत आहे. त्यानुसार पोलिसांनी तेथे जाऊन तरुणाला पकडले. राहुल सुभाष राठोड (वय २०) याच्याकडून ४० हजार रुपयांचे गावठी पिस्तुल व एक जिवंत काडतुस जप्त केले आहे.