पुण्यात मदत करण्याच्या बहाण्याने तरुणीवर बलात्कार
बलात्काराच्या घटनेने पुणे हादरले, पार्टीसाठी गेलेल्या तरुणीवर अत्याचार, तरुणीसोबत नेमके काय घडले?
पुणे दि २(प्रतिनिधी)- सांस्कृतिक राजधानी अशी ओळख असलेल्या पुण्यात महिला अत्याचाराच्या घटनात वाढ झाली आहे. तरुणीवर झालेल्या कोयता हल्ल्याची घटना ताजी असताना आता पार्टी करून घरी जाणाऱ्या मुलीवर मदतीच्या बहाण्याने बलात्कार करण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे. त्यामुळे महिला सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या प्रकरणी आरोपीला अटक करण्यात आली आहे.
दत्तात्रय खरात असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. याबाबत एका ३२ वर्षीय तरुणीने विमानतळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. विमानतळ पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार विमाननगर भागात बॅकयार्ड कॅफे असून तरुणी आणि तिची मैत्रीण तसेच दोन मित्र हे गुरुवारी रात्री पार्टी करण्यासाठी या कॅफेमध्ये गेले होते. उपाहारगृहात दहा हजार रुपयांचे बिल झाले. तरुणीने डेबिट कार्डद्वारे बिल अदा करण्याचा प्रयत्न केला. मात्र, डेबिट कार्डच्या सांकेतिक शब्दात चूक झाल्याने बिल अदा होऊ शकले नाही. त्यानंतर उपाहारगृहातील व्यवस्थापक आणि कामगारांनी तरुणीला शिवीगाळ करुन दोन मोबाइल संच, पॅनकार्ड, आधारकार्ड, डेबीट कार्ड ताब्यात घेतले. बिल भराल तेव्हाच वस्तु परत मिळेल असे हॉटेल व्यवस्थापकाने सांगितले. यावेळी, काही वेळ ही तरुणी उपाहारगृहात थांबली होती. त्यावेळी उपाहारगृहातील एका ग्राहक तरुणाने तरुणीला मदत करण्याचा बहाणा केला. त्याने तरुणीला घरी सोडतो असे सांगून त्याच्या दुचाकीवर बसवले. तेथून त्याने खराडी येथील एका हॉटेलमध्ये नेत तिच्यावर बळजबरीने बलात्कार केला. विशेष म्हणजे आरोपीने तिचेच ओळखपत्र घेत नोंदवहीत सही केली होती. तसेच बलात्कार केल्यानंतर पळ काढला होता. पण तरूणीने लॉजच्या रिसेप्शनवर चाैकशी करून तरुणीची माहिती जाणून घेतली.
या प्रकारानंतर पीडित महिलेने विमानतळ पोलिसात धाव घेत तक्रार दाखल केली. पोलीसांनी तातडीने कार्यवाही करत दत्तात्रय खरात याला तात्काळ अटक केली. या प्रकरणाचा पुढील तपास वरिष्ठ पोलिस निरीक्षक विलास सोंडे यांच्या मार्गदर्शनाखील पोलिस उपनिरीक्षक चौधरी करत आहेत. या प्रकारामुळे महिला वर्गात भीतीचे वातावरण आहे.