
पुणे दि ८ (प्रतिनिधी)- वेडिंग वेबसाईटवरून झालेल्या ओळखीतून एकाने तरुणीला लग्नाचं आमिष दाखवून तिच्यावर वारंवार बलात्कार केल्याची घटना पुण्यात उघडकीस आली आहे. त्याचबरोबर आरोपीने तरुणीची १४ लाख रुपयांची फसवणूक केली असून त्याच्या विरोधात येरवडा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.शंतनू गंगाधर महाजन असे गुन्हा नोंद झालेल्या तरुणाचे नाव आहे. याबाबत एका तरुणीने येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
शंतनू आणि तरुणीची ओळख एका वेडिंग वेबसाईटवर झाली. त्यानंतर त्याने तरुणीला जूनमध्ये एका हॅाटेलमध्ये भेटण्यासाठी बोलाविले.हळूहळू त्याने तरुणीला जाळ्यात ओढून तिच्यावर अत्याचार केले. त्या वेळी त्याने तरुणीचा मोबाइल क्रमांकामधील बँक खात्याची गोपनीय माहिती, छायाचित्र तसेच अन्य माहिती घेतली. या माहितीचा गैरवापर करुन शंतनुने तरुणीच्या नावावर १४ लाख रुपयांचे कर्ज घेतले. तरुणीच्या खात्यात जमा झालेली कर्जाची रक्कम त्याने परस्पर स्वत:च्या खात्यात वर्ग करुन घेतली. तरुणीच्या लक्षात हा प्रकार आल्यानंतर तिने पोलिसांकडे तक्रार दिली. गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक उत्तम चक्रे तपास करत आहेत. वेडिंग वेबसाईटवरील फसवणूक टाळण्यासाठी स्थळाची पूर्ण चाैकशी करावी असे आवाहन पोलीसांनी केले आहे.