Latest Marathi News
Ganesh J GIF

मोहिते पाटील यांच्यानंतर भाजपला पश्चिम महाराष्ट्रातून भाजपला आणखी एक धक्का

माढा लोकसभेतून उमेदवारी न मिळाल्यामुळे धैर्यशील मोहिते पाटील यांनी भाजपच्या सदस्यत्वाचा राजीनामा देत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षात प्रवेश केला आहे.शरद पवारांच्या पक्षाने मोहिते पाटलांना माढ्यातून लोकसभेची उमेदवारीही दिली आहे. मोहिते पाटलांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षात प्रवेश केल्यामुळे माढ्यासोबतच सोलापूरचं गणितही बदलण्याची शक्यता आहे, कारण मोहिते पाटील कुटुंबाचा या दोन्ही मतदारसंघात प्रभाव आहे.

मोहिते पाटील यांच्यानंतर भाजपला पश्चिम महाराष्ट्रात आणखी एक धक्का बसला आहे. भाजपचे जतचे माजी आमदार विलासराव जगताप यांनी भाजपच्या सदस्यपदाचा राजीनामा दिला आहे. विलासराव जगताप यांनी विशाल पाटलांना पाठिंबा जाहीर केला आहे. काहीच दिवसांपूर्वी संजय राऊतांनी जगताप यांची भेट घेत चंद्रहार पाटील यांच्या उमेदवारीला पाठिंबा देण्याची विनंती केली होती.

सांगलीमधून भाजपने संजयकाका पाटील यांना उमेदवारी दिल्यामुळे विलासराव जगताप नाराज झाले आणि त्यांनी भाजपला इशारा दिला होता. जतमध्ये विलासराव जगताप यांनी कार्यकर्त्यांचा मेळावा घेत आपली भूमिका जाहीर केली आहे. पक्षांतर्गत सुरू असणाऱ्या कुरघोड्या त्याचबरोबर होणारे अवमूल्यन यामुळे आपण राजीनामा देत असल्याचं विलासराव जगताप यांनी सांगितलं आहे. विलासराव जगताप यांनी विशाल पाटलांना पाठिंबा जाहीर केल्यामुळे खासदार संजयकाका पाटील यांची डोकेदुखी वाढणार आहे.

एकीकडे विलासराव जगताप यांनी राजीनामा दिल्यामुळे भाजपला धक्का बसला असला तरी महाविकासआघाडीचे उमेदवार चंद्रहार पाटील यांच्यासमोरच्या अडचणीही कमी व्हायचं नाव घेत नाहीयेत. सांगलीच्या जागेवर काँग्रेसकडून दावा केला गेला तरी ही जागा शिवसेना ठाकरे पक्षाला गेल्यामुळे विशाल पाटील बंडखोरी करण्याच्या तयारीत आहेत. विशाल पाटील हे सांगलीतून अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करू शकतात. काँग्रेस आमदार विश्वजीत कदम यांनीही विशाल पाटील यांना पाठिंबा दिला आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!