Latest Marathi News
Ganesh J GIF

इंदापूर तालुक्यातून दोन महत्त्वाचे नेते उद्या शरद पवारांच्या राष्ट्रवादीत जाणार , अजित पवारांना दुहेरी धक्का

बारामती लोकसभा मतदारसंघात यंदा दोन तुल्यबळ उमेदवारांमध्ये सामना रंगत असून स्थानिक नेत्यांना आपल्याकडे खेचण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस आणि शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात रस्सीखेच सुरू आहे. इंदापूर तालुक्यात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात निर्माण झालेली नेतृत्वाची पोकळी आप्पासाहेब जगदाळे आणि भरत शहा यांच्या पक्षप्रवेशामुळे भरून काढण्यास मदत होणार आहे.

अजित पवारांनी काही दिवसांपूर्वी माजी जिल्हा परिषद सदस्य प्रवीण माने यांना सोबत घेत शरद पवारांना धक्का दिला होता. आता पवारांकडूनही या धक्क्याची परतफेड करण्यात येणार असून इंदापुरातील महायुतीचे दोन नेते आपल्या पक्षात आणण्यात त्यांना यश आलं आहे. पुणे जिल्हा सहकारी बँकेचे संचालक आप्पासाहेब जगदाळे आणि इंदापूर नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष भरत शाह हे उद्या शरद पवार यांच्या उपस्थितीत त्यांच्या पक्षात प्रवेश करणार आहेत.

बारामती लोकसभेत यंदा पवार कुटुंबात राजकीय सामना सुरू असून विद्यमान खासदार सुप्रिया सुळे या महाविकास आघाडीकडून तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी महायुतीकडून निवडणूक लढवत आहेत. अजित पवार यांचा बारामती तालुक्यासह पुणे जिल्ह्यात मोठा राजकीय प्रभाव आहे. याच अजित पवार यांच्या पत्नी लोकसभा निवडणुकीत उतरल्याने सुप्रिया सुळे यांना निवडणुकीत विजयासाठी प्रयत्नांचा पराकाष्ठा करावी लागत आहे. बारामती लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादीतील बहुतांश पदाधिकारी अजित पवारांसोबत असल्याने संघटनात्मक पातळीवर सुळे यांना अडचणींचा सामना करावा लागत असल्याचं चित्र आहे. हीच अडचण दूर करण्यासाठी आता विरोधातील नेत्यांना आपल्याकडे आणण्याचा प्रयत्न राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून केला जात आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये झालेल्या विभागणीनंतर विद्यमान आमदार दत्तात्रय भरणे अजित पवारांच्या गटात गेले. गेल्या आठवड्यात शरद पवार गटातील विधानसभा निवडणुकीचे प्रबळ दावेदार प्रवीण माने देखील देवेंद्र फडणवीस यांचे चहापान करुन अजित पवार यांच्या गटात सहभागी झाले. त्यामुळे गेल्या दहा वर्षापासून विधानसभा निवडणूक लढविण्यास इच्छुक असणाऱ्या आप्पासाहेब जगदाळे यांना आत्ता मार्ग खऱ्या अर्थाने मोकळा झाला आहे. आप्पासाहेब जगदाळे हे हर्षवर्धन पाटील यांचे मामा असले तरी त्यांच्यामध्ये अधूनमधून मतभेद होत असत. सन २०१९ च्या निवडणुकीआधी त्यांची दिलजमाई झाली होती. पाटील यांचा प्रचार करण्यात जगदाळे यांनी कसली ही कसर सोडली नव्हती. त्यामुळे हर्षवर्धन पाटील विजयाच्या उंबरठ्यापर्यंत आले होते. त्यानंतर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीच्या वेळी उमेदवारांच्या कारणावरून त्या दोघांचे परत बिनसले. अजित पवारांनी साथ दिली. बाजार समितीवर जगदाळे यांची सत्ता आली. आत्ता राष्ट्रवादी काँग्रेसच्या विभागणीनंतर चित्र बदलले आहे. अजित पवार, आ.दत्तात्रय भरणे, प्रदीप गारटकर, प्रवीण माने हे सारे बिनीचे शिलेदार आत्ता शरद पवारांसोबत नाहीत. मात्र आता आप्पासाहेब जगदाळे व त्यांच्या पाठोपाठ त्यांचे बंधू पंचायत समिती सदस्य प्रदीप जगदाळे यांच्यामुळेच शरद पवार यांची बाजू भक्कम होणार आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!