जीवघेण्या अपघातातून अजित पवार थोडक्यात बचावले
...तर श्रद्धांजली वाहावी लागली असती म्हणत अजित पवारांचा मोठा खुलासा
बारामती दि १५(प्रतिनिधी) – राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विरोधी पक्षनेते अजित पवार लिफ्ट अपघातातून थोडक्यात बचावले आहेत. शनिवारी पुण्यात येथील एका रुग्णालयाचं उद्घाटन केल्यानंतर अजित पवारांची लिफ्ट चौथ्या मजल्यावरून कोसळली. या प्रकारानंतर लिफ्टचा दरवाजा तोडून अजित पवारांसह त्यासोबत असलेल्या डॉक्टरांना बाहेर काढले. स्वत: अजित पवार यांनी त्यांच्यासोबत घडलेल्या या भीषण घटनेबाबतची माहिती दिली आहे. त्यामुळे खळबळ उडाली आहे.
अजित पवार म्हणाले की, “मी काल पुणे दौऱ्यावर होतो. पुणे येथील हर्डीकर हॉस्पिटलमध्ये उद्घाटनासाठी लिफ्टने जात असताना चौथ्या मजल्यावर जाताना लिफ्ट बंद पडली आणि काही क्षणात लिफ्ट चालू होऊन काही कळायच्या आत थेट जमिनीवर आदळली.माझ्यासोबत असलेले हर्डीकर डॉक्टर हे ९० वर्षे वयाचे. पण सुदैवाने आम्ही बचावलो. लिफ्टचा दरवाजा तोडून आम्ही बाहेर निघालो नाहीतर आज श्रद्धांजलीचा कार्यक्रम झाला असता. याबाबत मी पत्नी आणि आईलाही बोललो नाही. मी पत्रकारांनाही सांगितलं नाही, नाहीतर कालच ब्रेकिंग न्यूज सुरू झाली असती. याबाबत कुणालाही बोलून नका, हे मी यांना सांगितले होते,’ मात्र आज तुम्ही घरची माणसे असल्याने मला राहवलं नाही, असं म्हणत अजित पवार यांनी पुण्यातील प्रसंग बारामतीच्या कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांसमोर कथन केला आहे.
काल माझ्या वडिलांची पुण्यतिथी होती. त्यामुळं घरात कोणालाच सांगितले नाही. माध्यमांना देखील काल याबाबतची माहिती मी दिली नाही. तुमच्या सर्वांच्या आर्शीवादाने मला काही झालं नाही. अशा घटना घडत असतात. या घटनेनंतर काही न झाल्याचं दाखवून मी भाषण केलं आणि घरी परतो, अशी माहितीही अजित पवार यांनी दिली. काल अजित पवारांचा लिफ्टचा अपघात तर आज सुप्रिया सुळेंची साडी पेटलेली त्यामुळे कार्यकर्त्यांनी चिंता व्यक्त केली आहे.