Latest Marathi News

पुणे पोलीसांच्या कारवाईनंतरही कोयता गँगची दहशत कायम

महिलेला मारहाण, तर फुकट सिगरेटसाठी दुकानदाराला धमकी, व्हिडीओ व्हायरल

पुणे दि १६(प्रतिनिधी)- पुण्यातील सिंहगड रस्त्यावरील गोऱ्हे बुद्रुक गावात एका दुकानदाराकडून फुकट सिगारेट घेण्यासाठी काही सराईतांनी तलवार दाखवून दहशत माजविण्याचा प्रयत्न केला. रविवारी सायंकाळी पाचच्या सुमारास ही घटना घडली. याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. यातील काही जण सराईत आरोपी असून हवेली पोलिस शोध घेत आहेत.

विद्येचे माहेरघर असलेल्या पुण्यामध्ये मागच्या काही वर्षांमध्ये गुन्हेगारीचं प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढले आहे. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यात कोयता गँग विरूद्ध कडक कारवाई करण्याचे आश्वासन देऊन २४ तास उलटायच्या आतच पुन्हा एकदा कोयत्याचा धरार पहायला मिळाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार गोऱ्हे बुद्रुक येथील माळवाडी येथे सायंकाळी महिला आपल्या घरासमोर बसली होती व लहान मुले बाहेर खेळत होती. रस्त्यावरुन दुचाकीवरून काही तरुण वेगाने ये-जा करत होते. महिलेने मुले खेळत असल्याने दुचाकीस्वारांना हळू गाडी चालवा म्हणून सांगितले असता त्याचा राग धरुन त्या तरुणांनी महिलेला मारहाण केली. पुन्हा काही वेळाने येत अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करू लागले. या घटनेचा व्हिडीओ परिसरात व्हायरल झाला असून संबंधित तरुण सराईत गुन्हेगार आहेत. त्याचबरोबर या गुन्हेगारांनी एका दुकानदाराकडून फुकट सिगारेट घेण्यासाठी त्याला धमकावल्याचा प्रकार समोर आला आहे. गांजाची नशा करुन हे सराईत सातत्याने गावात दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करत असतात असे गावकऱ्यांनी सांगितले आहे. दरम्यान आरोपींना पकडण्यासाठी दोन पथके रवाना केली आहेत. त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल, असे हवेली ठाण्याचे पोलिस निरीक्षक सदाशिव शेलार यांनी सांगितले आहे.

पुणे पोलिसांनी काही दिवसांपूर्वी कोयता गँगवर कारवाई सुरु केली आहे. हडपसर परिसरात कोयता नाचवणा-यांवर मोक्का लावण्यात आला आहे तर कोम्बिंग ऑपरेशनच्या माध्यमातून साराईतांची झाडाझडती घेतली जात आहे. पोलीसांनी आत्तापर्यंत १०८ पेक्षा अधिक कोयते जप्त केले आहेत. तरी कोयत्याचा धुडगूस कायम आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!