‘अजित पवार निश्चित मुख्यमंत्री झाले पाहिजेत’
शिंदे गटाच्या आमदाराचा अजित पवारांना पाठिंबा, वेळही सांगितली, शिंदे गटात दुफळी?
मुंबई दि २८(प्रतिनिधी)- राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी शिंदे-फडणवीस यांच्यासोबत हातमिळवणी करत उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. यामुळे राज्यामध्ये मोठा राजकीय भूकंप झाला. आता अजित पवार यांचा भावी मुख्यमंत्री म्हणून अनेकदा उल्लेख केला जात आहे. पण आता शिंदे गटाच्या आमदाराने मोठे विधान केल्याने खळबळ उडाली आहे.
आमदार संजय शिरसाट यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, “भविष्यात अजित पवार निश्चित मुख्यमंत्री झाले पाहिजेत पण, २०२४ पर्यंत एकनाथ शिंदे मुख्यमंत्री आहेत. भविष्यात म्हणजे ५ ते १० वर्षांनंतरही अजित पवार मुख्यमंत्री होतील. ते आता कसे सांगता येईल. नुकतेच प्रफुल्ल पटेल यांनी माध्यमांशी बोलताना म्हणाले की, अजित पवार महाराष्ट्रातील एक वजनदार आणि लोकप्रिय नेते आहेत.आज ना उद्या अजित पवारांना मुख्यमंत्रीपदाची संधी मिळेल. आमच्या पक्षाचे नेतृत्व अनेक वर्षापासून ते करत आले आहेत. असे वक्तव्य केले होते. त्यावर शिससाठ यांनी हे विधान केले आहे. अजित पवार सरकारमध्ये सामील झाल्यापासूनच एकनाथ शिंदे यांचे मुख्यमंत्री पद जाणार असल्याची चर्चा आहे. त्यामुळे शिंदे गटाचे आमदारही सावध प्रतिक्रिया देताना देत आहेत. विरोधकांकडूनही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मुख्यमंत्रिपद जाणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत. त्यामुळे राज्यातील राजकारण एका वेगळ्या वळणावर येऊन ठेपले आहे.
अजित पवार मुख्यमंत्री बनण्यासाठीच महायुतीत सामील झाले अशा चर्चा रंगू लागल्या. तसेच अजित पवार लवकरच मुख्यमंत्री होतील अशी वक्तव्ये देखील राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून करण्यात आली आहेत. त्यामुळे अजित पवार मुख्यमंत्री झाल्यास शिंदे गटाचे आमदार काय भुमिका घेणार याची देखील उत्सुकता असणार आहे.