दिल्ली हादरले! तरुणाने महिलेचा गोळ्या झाडून केला खून
घटनेनंतर आरोपी तरुणाची आत्महत्या, दिल्लीत कायदा सुव्यवस्था चव्हाट्यावर, हत्येचे कारणही समोर
दिल्ली दि २८(प्रतिनिधी)- दिल्ली पुन्हा एकदा हत्याकांडने हादरली आहे. दिल्लीतील डाबरी भागात गुरुवारी रात्री बिल्डरच्या पत्नीची गोळी झाडून हत्या करण्यात आली. पण त्यानंतर हत्या करणाऱ्याने स्वतः आत्महत्या केली. या प्रकारामुळे राजधानी दिल्लीत मोठी खळबळ उडाली आहे.
हत्या झालेल्या महिलेचे नाव रेणू गोयल असे असून २३ वर्षीय आशिषने तिच्या घरासमोर जाऊन तिच्यावर गोळीबार केला. आशिष आणि रेणू एकमेकांना ओळखत होते. ते दोन वर्षांपूर्वी एकाच जिममध्ये जात असत. रेणूला हल्ल्यानंतर तात्काळ रुग्णालयात नेण्यात आले, परंतु तिथे दाखल करण्यापूर्वीच तिला मृत घोषित करण्यात आले. रेणू गृहिणी होती. ती तिच्या पती आणि तीन मुलांसह राहत होती. हल्लेखोर पायी तिच्या घरासमोर आला आणि त्याने पाँइंट ब्लँक रेंजमधून महिलेवर गोळी झाडली. मात्र, आशिषने महिलेची हत्या का केली हे मात्र पोलिसांना अद्यापही समजू शकलेले नाही. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत. वैयक्तिक वैमनस्यातून हत्या झाल्याचे प्रथमदर्शनी दिसत आहे, परंतु आम्ही या प्रकरणाचा सर्व बाजूंनी तपास करत आहोत, असे पोलीसांनी सांगितले आहे. दरम्यान डाबरी परिसरात गोळीबारामुळे घटनास्थळी एकच गोंधळ उडाला होता. या प्रकरणी हल्लेखोराने कसा गोळीबार केला, याचा तपास पोलीस करत आहेत. या परिसरात इतर ठिकाणी लावण्यात आलेले सीसीटीव्ही फुटेजही तपासण्यात येणार आहेत.
तपासादरम्यान पोलिसांनी आरोपीची ओळख पटवली. यानंतर पोलीस आरोपी आशिषच्या घराच्या घरी पोहोचले. आत गेल्यावर आशिष हा घराच्या टेरेसवर मृतावस्थेत पडला होता. त्याने देशी बनावटीच्या पिस्तुलाने स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली होती. त्यामुळे या प्रकरणाचे गुढ वाढले आहे.