‘अजित पवारांमुळे राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार रखडला’
भाजपच्या बड्या नेत्याचा दावा, शरद पवार आणि राऊंतावर या शब्दात टिकास्त्र
सोलापूर दि १३(प्रतिनिधी) – राज्यात शिंदे-फडणवीस सरकार स्थापन होऊन जवळपास आठ महिने उलटली आहेत. तरीही राज्य सरकारच्या दुसऱ्या मंत्रीमंडळ विस्ताराचा मुहूर्त ठरलेला नाही. राज्यमंत्री नसल्यामुळे विधान परिषदेत कोण अर्थसंकल्प सादर करणार यावर खल सुरु आहे. पण भाजपा शिंदे सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार अजित पवारांमुळे रखडल्याचा चकित करणारा आरोप करण्यात आला आहे.

विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी काही दिवसापूर्वी नऊ महिन्यात मूल जन्माला येते पण या सरकारचा अजून मंत्रिमंडळ विस्तार झालेला नाही असा टोला लगावला होता.या सगळ्या घडमोडीवर माजी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी मंत्रीमंडळ विस्तार न होण्याला अजित पवार कारणीभूत असल्याचा खळबळजनक आणि हास्यास्पद दावा केला आहे. यावेळी खोत यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनादेखील लक्ष्य केले आहे. विस्तारावर बोलताना खोत म्हणाले “अजित पवारांमुळेच मंत्रिमंडळाचा विस्तार लांबला आहे. कारण त्यांचा मुहूर्त अजून ठरत नाही. शपथविधी कधी घ्यायचा? हे नक्की झालं की मंत्रिमंडळाचा विस्तार होईल,” असा टोला खोत यांनी लगावला आहे. तर “शरद पवारांनी ‘लोक माझे सांगाती’ या आपल्या पुस्तकात अदाणी समूहाचे प्रमुख गौतम अदाणी यांचे कौतुक केलं आहे. आणि आता तेच अदाणींविरोधात आंदोलन करत आहेत.पण त्या पुस्तकात शेतक-यांनबद्दल काहीच नाही अशी टीकाही खोत यांनी केली आहे. यावेळी त्यांनी शरद पवारांना ओसाड गावचे पाटील, तर संजय राऊत यांना टाइम पास चॅनल म्हणत बोचरी टिका केली आहे.
खोत यांनी यावेळी राज्य सरकारलाही खडे बोल सुनावले आहेत. एखादा दगड शेतकऱ्यांनी मारला असेल तर समजून घेऊ शकतो, कारण ती पोटातली आग असते. शेतकऱ्यांचे प्रश्न सरकारने जाणून घ्यावेत, चर्चेतूनही मार्ग काढला जाऊ शकतो असा सल्ला त्यांनी दिला आहे. पण मंत्रिमंडळ विस्ताराबाबत वारंवार बडे दावे करण्यात येत असतात अशात खोत यांनी चकित करणारा दावा केला आहे.