अजित पवार, सुनेत्रा पवार यांना ईडीकडून क्लीनचिट?
महाराष्ट्र राज्य सहकारी बँक घोटाळ्यात नवा ट्विस्ट, भाजपाकडून अजितदादांना भेट
मुंबई दि १२(प्रतिनिधी)- महाराष्ट्र राज्य सहकारी बॅंकेच्या घोटाळ्याप्रकरणी ईडीकडून आरोपपत्र दाखल करण्यात आलं आहे. या आरोपपत्रात विरोधी पक्षनेते अजित पवार आणि पत्नी सुनेत्रा पवार यांचं नाव नसल्याची माहिती समोर आली आहे. ईडीने आता अजित पवारांशी संबंधित या कंपनीला आरोपी बनवलं आहे. तसेच कंपनीच्या विरोधात आरोपपत्रही दाखल केले आहे.
अजित पवार आणि त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांची नावे ईडीच्या आरोपपत्रातून वगळण्यात आली आहेत. असे असले तरी एमएससी बँक घोटाळ्याची चौकशी करताना समोर आलेल्या काही कंपन्यांची नावे कायम ठेवण्यात आली आहेत. दरम्यान, महाराष्ट्र राज्य सहकारी बँक घोटाळ्या प्रकरणी ईडीने पुरवणी आरोपपत्रं दाखल केले आहे. तुर्तास जरी अजित पवारांनी दिलासा मिळाला असला तरी पुढील चौकशीअंती अजित पवारांचं नाव येण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. कारण ईडीने न्यायालयात राज्य सहकारी बॅंकेच्या घोटाळ्याप्रकरणी अद्याप कोणत्याही स्वरुपात दखल घेतलेली नसून या प्रकरणाची पुढील सुनावणी १९ एप्रिल रोजी होणार आहे. जरंडेश्वर साखर कारखान्याची एकूण ६५ कोटींची संपत्ती सध्या गुरू कमोडिटी सर्व्हिसेसच्या नावावर असून जरंडेश्वर शुगर मिल प्रायव्हेट लिमिटेडला लीजवर आहे.या कारखान्याचा लिलाव कमी किंमतीत झाला आहे. स्पार्कलिंग सॉईल ही अजित पवार आणि सुनेत्रा अजित पवार यांच्याशी संबंधित कंपनी असल्याचे तपासात समोर आले आहे. मिलचा वापर केल्याचा आरोप ईडीकडून करण्यात आला होता. पण अजित पवार यांचे नाव नसल्याने या प्रकरणात आता ट्विस्ट आला आहे.
या प्रकरणी अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ईडी प्रकरणाची चौकशी सुरू आहे. अद्याप क्लीन चीट दिलेली नाही. माझ्या माहितीनुसार चौकशी सुरु आहे असं अजित पवार म्हणाले आहेत. दरम्यान ईडीने आत्तापर्यंत एकदाही अजित पवारांना चौकशीसाठी समन्स बजावलेले नाही.