अजित पवार ४० आमदारांसह राष्ट्रवादीतून बाहेर पडणार?
शिवसेना आमदाराचा मोठा गाैप्यस्फोट, पक्षफूट टाळण्यासाठी पवारांचे राजीनामा अस्त्र?
मुंबई दि ४(प्रतिनिधी)- राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी पक्षाच्या अध्यक्षपदावरून निवृत्ती घेत असल्याचा निर्णय जाहीर केल्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. त्यानंतर आता शिवसेना आमदार महेश शिंदे यांनी देखील मोठा गौप्यस्फोट केला आहे. त्यामुळे पवारांचा राजीनामा आणि त्यामागील राजकारण याची चर्चा रंगली आहे.
शिवसेनेचे आमदार महेश शिंदे यांनी मात्र मोठा दावा केला आहे. ते म्हणाले “शरद पवारांचा वजीर काहीही केलं तरी ४० आमदारांना घेवुन गायब होणारच आहे. शरद पवार हुशार आहेत, त्यांना कळलं होते की त्यांचा वजीर निघून चालला आहे. ४० आमदारांना घेवुन त्यांचा वजीर गायब होणार होता, त्यामुळे पक्ष टिकवण्यासाठी अध्यक्षपदावरुन पायउतार होण्याचा निर्णय घेतला.परंतु थोड्या दिवसानी त्यांचा वजीर गायब होणारच आहे.” असा दावा शिंदे यांनी केला आहे. त्याचबरोबर अक्खा राष्ट्रवादी पक्षच नामशेष होण्याच्या मार्गावर चालला होता. एका घरात २ मुख्यमंत्री कसा होणार असा सवालही त्यांनी केला आहे. पण शिंदे यांच्या दाव्यामुळे खळबळ उडाली आहे. मागील काही दिवासांपासून अजित पवार भाजपात प्रवेश करणार असल्याच्या चर्चा सुरु होत्या. मात्र, अजित पवारांनी स्पष्टीकरण देत या चर्चांना पूर्णविराम दिला होता होता. पण शरद पवार यांच्या राजीनाम्यानंतर पुन्हा एकदा राजकीय घडामोडी सुरु होत आहेत.
महेश शिंदेंनी महाविकास आघाडीवर जोरदार टीका केली आहे. ज्या जमिनीवर आपण उभा होतो ती जमीनच आपली नाही हे उद्धव ठाकरे यांना कळायला लागलं आहे. ती जमीनच विकली गेली आहे. जमिनीचा सातबारा दुसऱ्याच्या नावावर आहे. वज्रमुठ करायला अंगात ताकद लागते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वज्रमुठ गायब केली आहे. अशी बोचरी टिका शिंदेनी केली आहे.