राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील नाराज?
राजीनाम्याची कलपना नसल्याने कोंडी, अजित पवारांच्या प्रभावामुळे पाटील काँग्रेसमध्ये जाणार?
मुंबई दि ४(प्रतिनिधी)- राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी मंगळवारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदावरुन निवृत्त होत असल्याची घोषणा केली आणि राज्याच्या राजकारणात खळबळ माजली आहे. त्यानंतर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटीलपक्षात नाराज असल्याच्या चर्चा सुरू आहेत, त्यामुळे गोंधळ उडालाय.
मुंबईतील व्हा. बी. सेंटरला राष्ट्रावादीच्या वरिष्ठ नेत्यांची बैठक होती. पण त्या बैठकीचे जयंत पाटील यांना निमंत्रण नव्हते. याबाबत बोलताना त्यांना मला बोलवण्याची गरज वाटली नसेल, म्हणून त्यांनी नसेल बोलावलं असं जयंत पाटील म्हणाले. तसेच, ना मी पक्षावर नाराज, ना पक्ष माझ्यावर नाराज, असंही जयंत पाटील म्हणाले आहेत. दुसरी गोष्ट म्हणजे शरद पवार निवृत्त होणार यांची माहिती फक्त अजित पवार आणि सुप्रिया सुळे यांना होती. पण राजीनामा देण्याच्या निर्णयाची साधी कल्पना पवारांनी जयंत पाटील यांना दिली नसल्याचे समोर आले आहे. व्यासपीठावर शरद पवार हे अजित पवार आणि सुप्रिया यांच्याशी वारंवार चर्चा करीत होते, त्याचवेळी आपण पक्षात एकटे पडल्याची लख्ख जाणीव जयंत पाटील यांना झाली. सध्या राष्ट्रवादीत अजित पवार आणि जयंत पाटील हे दोन गट आहेत. मात्र, शरद पवारांनी या दोन्हींमध्ये योग्य समतोल राखला आहे. पवारच बाजूला झाले तर अजित पवारांचे वर्चस्व वाढल्यानंतर आपली पक्षात किती किंमत राहील, याची भीती जयंत पाटील यांना वाटत असल्याचे काही पदाधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. त्याचबरोबर जयंत पाटील काँग्रेसमध्ये जाणार अशा बातम्या काही वृत्तपत्रात आल्या आहेत. त्यामुळे शरद पवार यांच्यानंतर पक्षात गटातटाचे राजकारण रंगण्याची शक्यता आहे. दरम्यान जयंत पाटलांनी पत्रकार परिषदेतून शरद पवार हे निवृत्तीच्या निर्णयावर ठाम असल्याची माहिती दिली. पण महत्वाचे म्हणजे शरद पवार यांच्या राजीनाम्यामुळे महाविकास आघाडीवर काही परिणाम होणार नाही, असे जयंत पाटील म्हणाले आहेत.
“जयंत पाटील यांना राष्ट्रवादीचे अध्यक्ष करावे,” अशी मागणी शरद पवार यांची बहीण सरोज पाटील यांनी केली आहे. पण “दिल्लीत माझी ओळख नाही, आणि दुसऱ्या राज्याशी माझा संपर्क देखील नाही. “मी महाराष्ट्रात काम करतोय. यामुळे लोकसभेत किंवा राज्यसभेत काम करणाऱ्या व्यक्तीने अध्यक्षपद भूषवावे,” “राष्ट्रीय पातळीवर काम करणाऱ्या नेत्यांनी अध्यक्षपद भूषवावे”, असे जयंत पाटील म्हणाले.