अजित पवारांची शरद पवारांवर कुरघोडी, जयंत पाटील यांची हकालपट्टी
पवार विरुद्ध पवार यांच्या लढाईत हकालपट्ट्यांचे राजकारण, सुप्रिया सुळेंवरही होणार कारवाई?
मुंबई दि ३(प्रतिनिधी)- राष्ट्रवादीच्या फूटीनंतर पक्षांतर्गत अनेक बदल केले जात आहेत. दोन्ही बाजूंनी आम्हीच खरा पक्ष असा दावा केला जात आहे. पण आता मात्र अनेकांची हकालपट्टी किंवा नियुक्ती करण्यात येत आहे. त्यामुळे संघर्ष तीव्र झाला आहे.
राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी अजित पवारांसह नऊ जणांवर शिस्तभंगाची कारवाई केल्यानंतर राष्ट्रवादीचे कार्यकारी अध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांनी जयंत पाटलांविरोधातच खेळी करत पाटलांचं प्रदेशाध्यक्षपद काढून घेतलं आहे. त्याऐवजी राष्ट्रवादीचे नवे प्रदेशाध्यक्ष म्हणून सुनिल तटकरे यांची नियुक्ती केली आहे. तर महिला प्रदेशाध्यक्ष म्हणून रूपाली चाकणकर यांची नियुक्ती केली आहे. दुसरीकडे पक्षविरोधी कारवाई केल्याचा ठपका ठेवत खासदार प्रफुल पटेल आणि सुनिल तटकरे यांची पक्षातून हकालपट्टी करण्याचा निर्णय पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवारांनी घेतला आहे. तसेच पक्षाच्या रजिस्ट्रीमधून त्यांच्या नावाची नोंदणी रद्द करण्यात येणार आहे. त्याचबरोबर राष्ट्रवादीने माजी मंत्री शिवाजीराव गर्जे, नरेंद्र राणे आणि विजय देशमुख या तिघांविरोधात बडतर्फीची कारवाई केली आहे. त्यामुळे ही लढाई लवकरच न्यायालयात जाण्याची शक्यता आहे. कालपासून अजित पवार यांनी आम्हीच राष्ट्रवादी, पक्ष आणि चिन्ह आमचाच असा दावा केला आहे. नऊ आमदारांवर अपात्रतेच्या कारावाईची नोटीस ही बेकायदेशीर आहे. एकाच नेत्याला प्रतोद आणि विरोधी पक्षनेतेपदी राहता येत नाही असंही पवार यावेळी म्हणाले आहेत. महत्वाचे म्हणजे प्रफुल्ल पटेल यांनी मी राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष या नात्याने अजित पवार यांची विधिमंडळ नेता, प्रदेशाध्यक्ष पदी सुनिल तटकरे आणि प्रतोदपदी अनिल पाटील यांची नियुक्ती केल्याचे म्हटले आहे. आता ५ जुलैला अजित पवार आणि शरद पवार यांनी आमदारांची बैठक बोलावली आहे. त्यानंतर एकूण संख्याबळ पाहून न्यायालयीन लढाईचे स्वरूप स्पष्ट होणार आहे.
अजित पवार गटाकडून पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून शरद पवार कायम राहतील असे सांगितले आहे. तसेच सुप्रिया सुळे यांची अध्यक्षपदावरून हकालपट्टी करणार का? असा प्रश्न विचारला असता हकालपट्टी करण्यासाठी आमचा पक्ष काढलेला नाही. आम्ही बेरेजचं राजकारण करतो आणि पक्ष वाढवतो.आम्ही इथे काय हकालपट्टी करायला बसलो आहोत का? असे उत्तर दिले आहे.