राष्ट्रवादीचा मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार अजितदादा की जयंत पाटील?
फडणवीसांचे अजितदादांना बळ?, शरद पवारांचे पाठबळ कोणासोबत?
मुंबई दि २२(प्रतिनिधी) – राष्ट्रवादी पक्षाला नेहमीच नेत्यांचा पक्ष म्हटले जाते. पण अजून पर्यंत कोणालाही मुख्यमंत्री पदाची संधी मिळालेली नाही. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या वाढदिवसाला मुंबईत ‘भावी मुख्यमंत्री’ म्हणून उल्लेख असलेले बॅनर झळकले होते. त्यानंतर अजित पवार यांचाही भावी मुख्यमंत्री म्हणून उल्लेख असलेले बॅनर झळकले आहेत. तर सुप्रिया सुळे पहिल्या महिला मुख्यमंत्री होणार असे नेहमीच म्हटले जात असते. पण आता अजित पवार यांनी मुख्यमंत्री पदाबाबत मोठे विधान केले आहे. त्यामुळे चर्चा सुरु झाली आहे.
अजित पवार यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांनी महत्वाचे विधान केले आहे. ते म्हणाले “काही उत्साही कार्यकर्त्यांनी मी मुख्यमंत्री व्हावे म्हणून बॅनर लावले आहेत. पण १४५ आमदारांच्या पाठिंब्याशिवाय मुख्यमंत्री होता येत नाही. त्यामुळे जरी मुख्यमंत्री म्हणून पोस्टर लागले तर ते मनावर घेऊ नका. त्या पोस्टरला फार महत्त्व देऊ नका. उद्या जर मी तुमचं होर्डिंग लावलं, तरी १४५ आमदारांचा पाठिंबा मिळत नाही तोपर्यंत त्या होर्डिंग लावण्याला काहीही अर्थ नाही. हे फक्त कार्यकर्त्याचं वैयक्तिक समाधान असते अशी स्पष्टोक्ती अजित पवार यांनी दिली आहे. पण अजित पवार यांनी आपल्या भूमिकेत बदल केल्याने चर्चा सुरु झाल्या आहेत. काही दिवसापूर्वी पवार यांनी राष्ट्रवादीने १९९९ साली मुख्यमंत्री पद द्यायला हवे होते अस मत मांडत अप्रत्यक्षपणे शरद पवार यांना लक्ष्य केले होते. पण आता बहुमताचा १४५ चा आकडा असे म्हणत आपली तलवार म्यान केली आहे. पण यामुळे राष्ट्रवादीची पक्षातील गटबाजी समोर आली आहे.
राष्ट्रवादीत अजित पवार आणि जयंत पाटील यांच्यात सुप्त संघर्ष असल्याची चर्चा आहे. त्यामुळे जयंत पाटील यांच्या वाढदिवसाला भावी मुख्यमंत्री असे बॅनर झळकल्यानंतर अजित पवार यांच्याही वाढदिवसाचे मुख्यमंत्री पदाचे बॅनर झळकले आहेत. पण शरद पवार आपला काैल कोणाला देणार हे पाहणेही तितकेच महत्वाचे असणार आहे.