अजितदादा म्हणाले ‘मी मरणार, माझ्या कार्यकर्त्यांना श्रद्धांजली अर्पण करावी लागेल’
अजित पवार असे का म्हणाले, राजकीय वर्तुळात चर्चांना जोरदार उधान, बघा नेमके कारण काय?
पुणे दि १९(प्रतिनिधी)- कसबा आणि चिंचवड पोट निवडणूकीचा प्रचार शिगेला पोहोचला आहे. पण चिंचवड मध्ये राष्ट्रवादी विरूद्ध भाजप अशी सरळ लढत होत असल्यामुळे नेत्यांमध्ये वैयक्तिक आरोप प्रत्यारोपही होत आहेत त्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या वक्तव्याने सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या आहेत. तसेच त्यांच्या वक्तव्यामुळे चर्चा सुरू आहेत.
चिंचवडचे उमेदवार नाना काटे यांच्या प्रचारासाठी अजित पवार आले होते. त्यावेळी अजित पवार यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी भाजपा प्रदेशाध्यक्ष बावनकुळेंवर जोरदार प्रहार केला बावबकुळेंच्या ‘अजित पवार यांना ४४० चा करंट लागला पाहिजे’ या विधानाचा समाचार घेताना पवार म्हणाले की, ‘अरे बापरे, ४०० चा करंट म्हणजे मी मरून जाणार. एवढा मोठा करंट बसल्यावर मी कसा जगू शकतो? अरेरे, मला आता माझ्या मतदारांना, माझ्या कार्यकर्त्यांना, सगळ्यांना श्रद्धांजली अर्पण करावी लागेल’ असे म्हणत खिल्ली उडवली आहे.पुढे बोलताना ते म्हणाले की, चंद्रशेखर बावनकुळे यांना म्हणावं आपण एका सत्ताधारी पक्षाचे अध्यक्ष आहात. आपण काय बोलतो याचा ताळमेळ असायला हवा. बोलण्याची संधी मिळाली म्हणून उगीच काहीही बोलायचं, उचलायची जीभ आणि लावायची टाळ्याला असं करू नका. बोलताना जरा तारतम्य ठेवा. असा सल्ला दिला आहे. यावेळी अजित पवार यांनी भाजपावर जोरदार टिका केली आहे.
चंद्रशेखर बावनकुळे यांनी चिंचवड येथे एका बैठकीत बोलताना अजित पवार यांच्यावर टीका केली. ते म्हणाले की, ‘येत्या २६ फेब्रुवारीला चिंचवड आणि कसबा मतदारसंघात मतदान होणार आहे. त्यावेळी तुम्ही इतक्या जोरात ईव्हीएमचे बटण दाबा की, अजित पवार यांना ४४० व्होल्टचा करंट लागला पाहिजे आणि पुन्हा कधी अजित पवार यांनी चिंचवडचे नाव घेतले नाही पाहिजे. असे म्हणता जगताप यांना विजयी करण्याचे आवाहन केले होते.