
‘अमित शाह, शिंदे आणि फडणवीसांनी लोकांची हत्या केली’
खासदाराचा गंभीर आरोप, शिंदे फडणवीसांनी दिले १० लाखाचे हे आव्हान
छ. संभाजीनगर दि १८(प्रतिनिधी)- नवी मुंबईतील खारघरमध्ये महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यातील दुर्घटनेत १३ जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली. या घटनेत प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे १३ जणांचा मृत्यू झाल्याचा आरोप विरोधकांकडून केला जात आहे. आता या घटनेवरुन खासदार इम्तियाज जलील यांनी भाजप व शिंदे सरकारवर हल्लाबोल करत आव्हान दिले आहे.
‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्काराच्या कार्यक्रमात घडलेल्या उष्माघात प्रकरणावर भाष्य करताना इम्तियाज जलील म्हणाले की, “आप्पासाहेब धर्माधिकारी यांचं काम खूप मोठं आहे. त्यांना ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार मिळाला, यासाठी मी त्यांचं अभिनंदन करतो. पण हा पुरस्कार देण्यासाठी जो कार्यक्रम घेण्यात आला, या कार्यक्रमाला धर्माधिकारी यांचे २० लाख अनुयायी बोलवण्यात आले होते. त्यांच्या मतांसाठी हा कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमासाठी १४ कोटी रुपये खर्च केले, असं मला सांगण्यात आले.” याठिकाणी २० लाख अनुयायांच्या मतांसाठी गृहमंत्री अमित शहा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी १३ जणांची हत्या केली आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी तीन तास उन्हात थांबवून दाखवा, मी १० लाख रुपये देतो’. असे आव्हान जलील यांनी दिले आहे.महाराष्ट्र भूषण पुरस्कारसाठी नेत्यांसाठी विशेष मंडपाची सोय करण्यात आली होती. परंतु कार्यक्रमासाठी आलेल्या श्री सेवकांना भर उन्हात बसवण्यात आले. यात १३ लोकांचा बळी गेला आहे. त्यानंतर आणि पाच लाखांच्या मदतीची घोषणा केली. ही काय जीवाची किंमत आहे का? असा सवाल जलील यांनी सरकारला विचारला आहे.
अजित पवारांच्या भाजपसोबत जाण्याच्या चर्चेवरून इम्तियाज जलील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ‘१३ जणांचा बळी गेल्यानंतर त्यावर चर्चा होऊ नये म्हणून अजित पवारांचा विषय काढला गेला, अजित पवार कधी जाणार, कुठे जाणार, किती लोकांना सोबत घेऊन जाणार? अजित पवार राष्ट्रवादी सोडणार या बातम्या पसरवल्या. असा गंभीर आरोप इम्तियाज जलील यांनी सरकारवर केला आहे.