अमृतपाल सिंगची पत्नी किरणदीप कौर पोलीसांच्या ताब्यात
देश सोडून जाण्याच्या प्रयत्नात असताना केली अटक, अमृतपाल मात्र अद्याप फरार
दिल्ली दि २१(प्रतिनिधी)- खलिस्तानी समर्थक अमृतपाल सिंहची पत्नी किरणदीप कौर हिला अमृतसर विमानतळावरून अटक करण्यात आली आहे. खलिस्तानची मागणी करणाऱ्या ‘वारीस पंजाब दे’ या संघटनेचा प्रमुख अमृतपाल सिंह सध्या फरार आहे. त्याला फरार घोषित करण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, किरणदीप कौर अमृतसर विमानतळावरून बर्मिंघमला पळून जाण्याचा प्रयत्न करत होती. त्यासाठी ती अमृतसर विमानतळावर पोहोचली होती, मात्र मिळालेल्या माहितीच्या आधारे विमानतळावर आधीच उपस्थित असलेल्या पोलिसांनी तिला ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली. विशेष म्हणजे किरणदीप कौरवर खलिस्तानी समर्थकांना निधी पुरवल्याचा आरोप आहे. पंजाब पोलीसने ‘वारीस पंजाब दे’ संघटनेचा प्रमुख अमृतपाल सिंह आणि त्याच्या साथीदारांवर १८ मार्च रोजी कारवाई केली होती. या दरम्यान पोलिसांनी त्याच्या हजारो साथीदारांना आणि समर्थकांना अटक केली. मात्र या कारवाईत अमृतपाल थोड्या साथीदारांसोबत पलायन करण्यात यशस्वी झाला. पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. किरणदीप कौर काही संस्थेसाठी ऑनलाइनच काम करते. त्यांचे कुटुंब मूळचे जालंधरचे असले तरी काही दशकांपूर्वी ते लंडनमध्ये स्थायिक झाले होते. दरम्यान अमृतपाल सिंग यांना पाठिंबा देण्याची हीच वेळ असून ती मागे हटणार नाही, असे किरणदीपने यापूर्वी सांगितले आहे. आता पोलीस किरणदीपकडून फरार अमृतपालची चौकशी करत आहेत. पोलिसांनी अमृतपालच्या आईचीही चौकशी केली आहे.
अमृतपाल सिंहने याच वर्षी फेब्रुवारी महिन्यात ब्रिटनमधील एनआरआय किरणदीप कौरशी लग्न केले. किरणदीप सिंग २८ वर्षांची आहे. लग्नानंतर किरणदीप अमृतपालसोबत त्याच्या गावी राहू लागली होती.